Headlines

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर:कोकण, घाटमाथा, विदर्भासह अनेक भागांना अलर्ट, धरणसाठ्यातही मोठी वाढ




राज्यात काही दिवस विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा वेग पकडला असून पुढील काही दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने कोकण, घाटमाथा, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि गोंदिया या विदर्भातील जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. धरणसाठ्यातही मोठी वाढ राज्यातील पावसाचा परिणाम धरणांच्या जलसाठ्यावरही दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरणाचा साठा अवघ्या पाच दिवसांत तब्बल ४७ टक्क्यांनी वाढून ८७ टक्क्यांच्या पुढे पोहोचला आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणेही ओव्हरफ्लो झाली असून मुळा धरणातील पाणीसाठा ६१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. अनेक नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. छत्रपती संभाजीनगर: ३१ जुलैपर्यंत ‘यलो अलर्ट’ छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी (२७ जुलै) सकाळपर्यंत चिकलठाणा वेधशाळेत ६.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. वाहतूक कोंडी आणि खड्डे: संततधार पावसामुळे शहरातील तापमानात घट झाली असली, तरी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सेव्हन हिल्स ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. हवामान बदलाचा फटका: सततच्या हवामान बदलामुळे शहरात साथीच्या आणि व्हायरल आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पुढील अंदाज: हवामान विभागाने शहरासाठी ३१ जुलैपर्यंत ‘यलो अलर्ट’ दिला असून, ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगाव: पाच दिवसांत ४७ टक्के जलसाठा वाढला, गिरणा ८७ टक्क्यांवर नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे गिरणा धरणाचा जलसाठा नव्वदीपर्यंत गेला. अवघ्या पाचच दिवसांत जलपातळीत तब्बल ४७ टक्के वाढ झाली. सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ८७.५१ टक्के जलसाठा झाला असून धरणात सध्या १२ हजार क्युसेक आवक सुरू असल्याने धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडण्याची शक्यता आहे. गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने हरणबारी,केळझर, चणकापूर हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने त्यातील आवक गिरणा धरणात येवू लागली आहे. आधी हा साठा ४० टक्क्यांवर होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, यंदा जुलैतच ८७ टक्के! : गतवर्षी २ सप्टेंबरला धरणाचा जलसाठा ९० टक्क्यांवर गेला होता. त्यानंतर एक दरवाजा उघडून ८१४ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला होता. तर २३ सप्टेंबरला धरणाचे सर्व १४ उघडण्याची वेळ आली होती. यंदा धरणात येणारी आवक पाहता पाऊस असाच सुरू राहीला तर जुलैअखेर धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. बंगाल ते उत्तराखंड 1500 किमीपर्यंत ढग दाटले:पावसाचा 1 आठवड्यासाठी अलर्ट, यूपीत शाळा वाहून गेली; एमपीत वीज पडून 3 ठार देशात पुढील आठवडाभर मुसळधार पाऊस पडू शकतो. नवीन उपग्रह प्रतिमेनुसार, पश्चिम बंगालपासून उत्तराखंडपर्यंत 1500 किमी परिसरात ढग दाटले आहेत. याचे कारण बंगालच्या उपसागरावर तयार झालेले ‘डीप डिप्रेशन’ आहे. ‘डीप डिप्रेशन’ ही समुद्रावर तयार होणारी कमी दाबाची एक मजबूत हवामान प्रणाली आहे. यात वाऱ्याचा वेग सामान्य डिप्रेशनपेक्षा जास्त असतो, ज्यामुळे मुसळधार पाऊस पडतो. हवामान विभागाच्या मते, मान्सून ट्रफच्या प्रभावामुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. सविस्तर वाचा सातारा-महाबळेश्वर मार्गावर महाकाय दरड कोसळली:जेसीबीही दरडीत अडकला, वाहतूक पूर्णपणे ठप्प; प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू राज्यात एका बाजूला अनेक भागांना अजूनही पावसाची प्रतीक्षा असताना, दुसऱ्या बाजूला मुंबई, कोकण, पुणे आणि सातारा परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीला मोठा फटका बसत असून, सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटातील ‘काळा कडा’ परिसरात मुसळधार पावसामुळे महाकाय दरड कोसळल्याची मोठी घटना घडली आहे. या भीषण घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *