![]()
सुमारे दहा वर्षांपूर्वी संपुष्टात आलेले प्रेमसंबंध सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा जुळले, अन् तेवढ्याच ताकदीने बहरलेही. मात्र, जुन्या ओळखीच्या या पुनरुज्जीवनाने शेवटी दोन सुखी कुटुंबांची राखरांगोळी केली. घाटंजी तालुक्यातील मानोली शिवारात सोमावारी सकाळी एका विवाहित महिला आणि पुरुषाचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दोघांनीही शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. गणेश नामदेव ढोले (वय 36 वर्षे, रा. मानोली, जि. यवतमाळ) आणि अंजली जोगेंद्र मीना (वय 32 वर्षे, रा. रामपूरा, राजस्थान) अशी मृत पावलेल्या दुर्दैवी प्रेमीयुगुलाची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दहा वर्षांपूर्वी अंजली कामानिमित्त मानोली येथे आली असताना तिची गणेश ढोले याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. मात्र, काही काळानंतर अंजली राजस्थानला परत गेली आणि कालांतराने तिचा विवाह झाला. इकडे मानोली येथे राहणाऱ्या गणेशचाही विवाह झाला होता. दोघेही आपापल्या संसारात रमले होते. सोशल मीडियाने जोडले नाते काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांचा पुन्हा संपर्क झाला आणि तब्बल एका दशकानंतर तुटलेले सूत पुन्हा जुळले. याच जुन्या प्रेमापोटी दोन दिवसांपूर्वी अंजली थेट राजस्थानवरून गणेशला भेटण्यासाठी मानोली येथे आली. मात्र, परप्रांतीय प्रेयसी थेट घरात आल्याने गणेश आणि त्याच्या पत्नीमध्ये प्रचंड वाद झाला. अंजलीच्या आगमनाने गणेशच्या घरात मोठे गृहकलहाचे वातावरण निर्माण झाले होते. अंजली मानोलीत आल्यानंतर कौटुंबिक वादाच्या तणावातून गणेश आणि अंजली दोघेही रविवारी रात्री गावालगतच्या शेत शिवारात निघून गेले. तिथेच त्यांनी विषारी औषध प्राशन करून टोकाचे पाऊल उचलले. सोमवारी सकाळी शेतात गेलेल्या एका ग्रामस्थाला दोघांचे मृतदेह आढळून आले. त्याने तात्काळ या घटनेची माहिती गावकऱ्यांना व पोलिसांना दिली. चार चिमुकल्यांचे छत्र हरपले घटनेची माहिती मिळताच घाटंजी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृत गणेशला दोन मुले आणि अंजलीलाही दोन मुले आहेत. या दोघांच्या टोकाचा निर्णय आणि कौटुंबिक कलहामुळे आज 4 निष्पाप चिमुकल्यांचे पितृ-मातृछत्र हरपले आहे. पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Source link
10 वर्षांनंतर सोशल मीडियावर जुने प्रेम पुन्हा बहरले:प्रेयसी घरात दाखल होताच पेटला वाद, यवतमाळात विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या