![]()
भीमा नदीवरील मौजे वडापूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचे काम प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर, पुराच्या काळातही वाहतूक सुरळीत राहण्यासाठी येथे उच्च पातळीवरील नवीन पूल उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार समाधान आवताडे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार आवताडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, हा पूल मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर या गावांना जोडणारा मुख्य दुवा आहे. सध्याचा रस्ता व पूल अत्यंत अरुंद असून पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर दोन महिने पाणी पुलावरून जाते. पर्यायी मार्ग नसल्याने शैक्षणिक, आरोग्य व कृषी व्यवहार ठप्प होतात. या बॅरेज कम पुलामुळे सिद्धापूर, तामदर्डी, वडापूरसह परिसरातील गावांना वर्षभर अखंड वाहतुकीची सोय उपलब्ध होणार आहे. बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणास मंजुरी देण्याची मागणी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील भीमा व माण नदीवरील बंधारे जुने झाले आहेत. १५ ऑक्टोबरनंतर बर्गे टाकूनही पाणी साठत नाही आणि पुराचे पाणी वाहून जाते. त्यामुळे भीमा नदीवरील मुंडेवाडी, बठाण, माचणूर, अरळी आणि माण नदीवरील महमदाबाद शेटफळ, गुंजेगाव, मारापूर, मल्लेवाडी, मुढवी या के. टी. वेअर बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यासाठी तातडीने सर्वेक्षण व अन्वेषणास मंजुरी द्यावी, अशी मागणी आ. आवताडे यांनी केली.
Source link
वडापूर बंधाऱ्याचे बॅरेज अन् उंच पुलात रूपांतर करावे:आमदार समाधान आवताडे यांची मागणी