![]()
ताथवडे परिसरात दहा आणि पाच वर्षांच्या दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली ६१ वर्षीय व्यक्तीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलींपैकी एकीच्या पोटात वारंवार दुखू लागल्यानंतर पालकांनी तिच्याकडे विचारपूस केली. त्यातून हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मे २०२६ ते २७ जुलै २०२६ या कालावधीत ताथवडे येथील एका घरात कथित घटना घडल्या. आरोपीने दहा वर्षीय मुलीचे तोंड दाबून तिला बळजबरीने स्वतःच्या घरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप तक्रारीत आहे. तिच्या पाच वर्षीय लहान बहिणीलाही आरोपीने घरात नेऊन अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार समजल्यानंतर पालकांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(२), ६५(२), ७४, ७६ आणि ३५१(३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणारा पोक्सो कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत पीडित मुलींचे नातेवाईक आणि नागरिकांनी वाकड पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक स्वाती घुगे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
Source link
दोन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार:61 वर्षीय नराधमाला बेड्या, पुण्यातील घटना