Headlines

ग्रामपंचायत मतदार यादीच्या हरकती, सूचनांना ब्रेक:प्रारूप प्रसिद्धी तूर्त स्थगित, एसआयआरमुळे कार्यक्रम रखडला




ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. यामुळे या यादीवरील सूचना आणि हरकतींनाही ब्रेक लागला आहे. राज्यात सध्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कामे सुरू असल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १५ जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार, २४ जुलै रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करून २९ जुलैपर्यंत त्यावर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत होती. त्यानंतर हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार होती. परंतु प्रारूप मतदार यादीच्या प्रकाशनाला स्थगिती मिळाल्याने पुढील संपूर्ण प्रक्रिया थांबली आहे. राज्य निवडणूक आयुक्तांच्या आदेशानुसार, २४ जुलै रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी याबाबतचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (एसआयआर) सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. काही ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या अपूर्ण असणे हे देखील यामागील एक कारण आहे. आयोगाच्या पाहणीत असे दिसून आले की, राज्यातील सुमारे १५ हजार ग्रामपंचायतींपैकी केवळ मोजक्याच ग्रामपंचायतींच्या प्रारूप याद्या संगणक प्रणालीद्वारे तयार झाल्या होत्या. या सर्व बाबींचा विचार करून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रारूप यादीच्या प्रकाशनाला स्थगिती दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *