![]()
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील “एमआरआय’ तपासणीसाठी रुग्णांना करावी लागणारी अडीच ते तीन महिन्यांची प्रतीक्षा व होणारा त्रास आता कमी होण्याची चिन्हे आहेत.
.
सध्या रुग्णालयात केवळ एकच “एमआरआय’ मशीन कार्यरत असल्याने मोठा ताण येत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पीपीपी तत्त्वावर बेंगळुरू मधील हेल्थमॅप डायग्नोस्टीक्स प्रा.लि. या कंपनीमार्फत आणखी एक अत्याधुनिक “एमआरआय’ मशीन सुरू करण्याचा येणार आहे.
रुग्णालय प्रशासनाने या मशिनसाठी कान-नाक-घसा विभागाच्या परिसरात जागा उपलब्ध करून दिली असून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली आहे. आवश्यक बांधकाम पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात नवीन मशीन सुरू होण्याची शक्यता आहे.
सध्या सुपर स्पेशालिटीतील एकमेव “एमआरआय’ मशीनवर दिवसाला सुमारे १५ रुग्णांची तपासणी केली जाते. मात्र, दररोज शंभरहून अधिक रुग्ण नोंदणी करतात. परिणामी, तपासणीसाठी रुग्णांना दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे.
मेंदू, मणका, सांधे, नसांचे विकार, अपघातग्रस्त तसेच गंभीर आजारांच्या रुग्णांना वेळेत एमआरआय न झाल्याने उपचारांनाही विलंब होत आहे.
रुग्णभारामुळे निर्णय रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने खासगी भागीदारीतून दुसरे एमआरआय मशीन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आवश्यक जागा निश्चित करण्यात आली असून कंपनीच्या तांत्रिक पथकाने जागेची पाहणी केली आहे. बांधकाम आणि तांत्रिक कामे पूर्ण झाल्यानंतर नवीन मशीन कार्यान्वित होणार आहे.
जागेची पाहणी सध्या एकाच एमआरआय मशीनवर ताण आहे. त्यामुळे रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे. पीपीपी तत्त्वावर दुसरे एमआरआय मशीन सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून कंपनीने जागेची पाहणी केली आहे. आवश्यक कामे पूर्ण झाल्यानंतर मशीन सुरू करण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. दिनेश नैताम, उपअधिष्ठाता, जीएमसी.