Headlines

राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा:हजारो भाविकांची उपस्थिती, स्मृतींना उजाळा




मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तीर्थस्थापना आणि सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रसंतांची महासमाधी रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती. पहाटे चार वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचा अभिषेक करण्यात आला. गुरुदेवप्रेमींनी गुरुमाऊलीला आदरांजली वाहताना विविध भजने गायली. शंखनाद आणि राळ-उदाच्या धूपाने संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते. सामुदायिक ध्यानाच्या कार्यक्रमानंतर आश्रमाच्या महाद्वारावर अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने नवी भगवी पताका फडकवण्यात आली. भाविकांना गुरुतत्त्वाशी जोडण्यासाठी तसेच गुरूंना साक्षी ठेवून सामाजिक, धार्मिक आणि राष्ट्रीय हितासाठी प्रेरणा मिळावी, या उद्देशाने अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ दरवर्षी गुरुकुंज येथे गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करते. या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे चार वाजता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील यांच्या हस्ते पूजन आणि सामुदायिक ध्यानाने झाली. यावेळी सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ यांनी सामुदायिक ध्यानावर चिंतन व्यक्त केले. दुपारी बारा वाजता योगेश गावंडे यांनी ‘गुरुमहात्म’ या विषयावर प्रवचन दिले. दिवसभर चाललेल्या या महोत्सवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली खंजरी भजने सादर करण्यात आली. या आयोजनासाठी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजन समितीच्या प्रमुखांनी अथक परिश्रम घेतले. गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. गुरुकुंज येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या गुरुपौर्णिमा महोत्सवाची सांगता सामुदायिक प्रार्थनेने करण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *