Headlines

आडगावच्या संघगिरी विहारात वर्षावासास प्रारंभ:22 उपासकांनी स्वीकारली दीक्षा




बौद्ध धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या वर्षावासानिमित्त पैठण तालुक्यातील आडगाव जावळे येथील ‘संघगिरी महाविहार, मयूर मृगादायवन’ येथे धम्ममय वातावरणात श्रामणेर–श्रामणेरी दीक्षा विधी सोहळा उत्साहात पार पडला. धम्ममय भारत मिशनच्या वतीने पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या २० व्या वर्षवास संकल्प अधिष्ठानानिमित्त या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. २२ बौद्ध उपासक-उपासिकांनी श्रामणेर, श्रामणेरी दीक्षा स्वीकारून बुद्ध, धम्म आणि संघाच्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला. भगवान बुद्धांनी सुरू केलेल्या प्राचीन परंपरेनुसार आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत भिक्खू-भिक्खुणी एकाच ठिकाणी राहून साधना, अध्ययन आणि धम्मप्रचार करतात. कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रात शील प्रदान, अल्पोपहार, सामूहिक ध्यानसाधना, बुद्धवचन पठण आणि भिक्खू संघास भोजनदान पार पडले. दुपारच्या सत्रात उपासकांचे भोजन, धम्मप्रवचन व दीक्षा विधी संपन्न झाला. या प्रसंगी पूज्य भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांनी वर्षवासाचे महत्त्व सांगताना ध्यान, शील आणि प्रज्ञेची साधना ही जीवनातील महत्त्वाची मूल्ये असल्याचे स्पष्ट केले. वर्षवास हा आत्मशुद्धी आणि सेवेचा पवित्र काळ असल्याचे त्यांनी सांगितले. या सोहळ्यास माजी जिल्हा मुद्रांक अधिकारी वसंतराव सरदिवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, कान्होपात्रा भवरे, रेखा शिंदे, तसेच पाचोड येथील राहुल शेळके, विलास मगरे, दिलीप बनकर, विशाल मोरे, बाळू शेळके व विशाल म्हस्के यांच्यासह राज्यभरातून आलेले मान्यवर व बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *