![]()
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण न्यायालयाने समन्स बजावले असून, त्यांना येत्या ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे समन्स २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील एका जुन्या आणि बहुचर्चित प्रकरणाशी संबंधित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांनी एका वादग्रस्त व्हिडीओप्रकरणी हा खटला दाखल केला होता. तक्रारदार (वसंत डावखरे) हयात नसताना हे समन्स आल्याने, उद्धव ठाकरे स्वतः कोर्टात हजर राहणार की वकिलामार्फत बाजू मांडणार, याकडे लक्ष लागले आहे. याच प्रकरणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. नेमकं काय आहे प्रकरण? हे संपूर्ण प्रकरण १५ वर्षांपूर्वीचे, म्हणजेच २००९ च्या लोकसभा निवडणुकीतील आहे. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत डावखरे आणि शिवसेनेचे उमेदवार आनंद परांजपे यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची डोंबिवलीत एक मोठी सभा पार पडली होती. याच सभेत ठाकरे यांनी वसंत डावखरे यांचा एक कथित व्हिडीओ सार्वजनिकरीत्या मंचावर दाखवला होता. काय होतं त्या व्हिडीओमध्ये? उद्धव ठाकरेंनी मंचावरून दाखवलेल्या त्या व्हिडीओमध्ये वसंत डावखरे हे आपल्या कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी ‘पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची कोणतीही भीती न बाळगता काम करा’, असे आवाहन करत असल्याचे दिसत होते. या व्हिडीओमुळे तेव्हा मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते. डावखरेंचा ‘मॉर्फिंग’चा आरोप आणि खटला हा व्हिडीओ समोर आल्यानंतर वसंत डावखरे यांनी तो थेट फेटाळून लावला होता. “हा व्हिडीओ मॉर्फ केलेला असून, माझी बदनामी करण्यासाठी त्यातील मजकूर निवडकपणे एडिट करण्यात आला आहे, असा दावा डावखरे यांनी केला होता. दुसरीकडे, शिवसेनेने तो व्हिडीओ खराच असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली होती. यामुळे संतापलेल्या वसंत डावखरे यांनी थेट कोर्टात धाव घेतली आणि या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. याच खटल्यात आता कल्याण कोर्टाने ठाकरेंना समन्स बजावले आहे. आता पुढे काय होणार? या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्यांनी हा खटला दाखल केला ते मुख्य तक्रारदार वसंत डावखरे आता हयात नाहीत. त्यामुळे या खटल्याचे पुढे नेमके काय होणार? असा कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे. ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत या प्रकरणाबाबत अधिक चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते!: पुणे विद्यापीठातील बोगस पदवी प्रकरणावरून रोहित पवारांचा शिक्षणमंत्री, मुख्यमंत्र्यांवर निशाणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चक्क ७० हजार रुपये घेऊन बोगस डिग्री आणि गुणपत्रक विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विद्यापीठाने एका कर्मचाऱ्याला निलंबित करून पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी विद्यापीठाची अधिकृत ‘प्रेस नोट’ सोशल मीडियावर शेअर करत, “महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते,” असा घणाघाती आरोप करत राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. सविस्तर वाचा
Source link
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचे समन्स:2009 सालच्या व्हिडीओ प्रकरणी 5-6 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश; काय आहे प्रकरण?