![]()
वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारातील एका राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या शेतातून कत्तलीच्या उद्देशाने बांधलेली १९ जनावरे वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ३० गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारात सय्यद इमरान याच्या शेतात कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने काही जनावरे बांधण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, उपनिरीक्षक एकनाथ डक, जमादार विजयकुमार उपरे, साहेबराव जाधव, आरीफ दोसानी यांच्या पथकाने बुधवारी ता. २९ सायंकाळी शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी त्या ठिकाणी तब्बल १९ जनावरे बांधण्यात आल्याचे दिसून आले. यामध्ये दोन गायी, सात बैल, पाच कारवड, ५ गोऱ्हांचा समावेश होता. सदर जनावरे विनाचारा पाण्याचे बांधलेले दिसून आल्यानंतर हि जनावरे कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने बांधण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामुळे पोलिसांनी सर्व जनावरे ताब्यात घेऊन वसमत येथील गोशाळेत जमा केली आहे. या जनावरांची एकूण किंमत १.६३ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. याप्रकरणी जमादार आरीफ दोसानी यांनी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये सय्यद इमरान याच्या शेतात जनावरांना निर्दयपणे बिना चाऱ्या पाण्याचे कत्तलीच्या उद्देशाने जनावरांना इजा होईल अशा उद्देशाने बांधण्यात आल्याचे नमुद केले. यावरून पोलिसांनी सय्यद इमरान याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार विजयकुमार उपरे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांना दिली उडवा उडवीची उत्तरे शेतात जनावरे आढळून आल्यानंतर पोलिसांनी सय्यद इमरान याच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून सदर जनावरे कोणाची आहेत याची विचारणा केली. मात्र त्याने सदर जनावराबाबत आपणास काहिही माहिती नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर सय्यद इमरान हा एका राजकिय पक्षाचा बडा कार्यकर्ता असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.
Source link
हिंगोलीत 19 जनावरांची सुटका:कत्तलीच्या संशयावरून राजकीय कार्यकर्त्यावर गुन्हा