![]()
राहुरी शहराचे ग्रामदैवत असलेल्या बुवासिद्ध देवांच्या वार्षिक यात्रा उत्सवाला बुधवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी विविध कार्यक्रमांना भाविकांनी मोठी गर्दी केल्याने संपूर्ण राहुरी शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी पहाटे बुवासिद्ध देवांच्या पादुकांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. वेदमंत्रांचा घोष आणि पारंपरिक धार्मिक विधींनी हा सोहळा पार पडला. अभिषेकानंतर कावडधारी भाविकांनी ढोल-ताशांचा गजर, डीजेचा निनाद आणि बुवासिद्ध देवांच्या जयघोषात भव्य कावड मिरवणूक काढली. मिरवणुकीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला. भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिरसात रंगलेले भाविक यामुळे शहरातील वातावरण उत्साहाने भारून गेले होते. सायंकाळी पारंपरिक झेंडा मिरवणूक भक्तिभावाने काढण्यात आली. त्यानंतर बुवासिद्ध देवांची महाआरती करण्यात आली. महाआरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी करत दर्शनाचा लाभ घेतला. रात्री राहिंज बंधू प्रस्तुत जागरण-गोंधळाचा कार्यक्रम रंगला. देवी-देवतांच्या पारंपरिक गीतांसह धार्मिक सादरीकरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. गुरुवारी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी महाआरती, महाप्रसाद वाटप आणि शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी झाली.शुक्रवारी यात्रा उत्सवाची सांगता कुस्ती स्पर्धा, महाआरती आणि अन्य धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे. कुस्ती स्पर्धेसाठी परिसरातील नामांकित मल्ल सहभागी होणार असल्याने क्रीडाप्रेमींमध्येही उत्सुकता आहे. यात्रेत लहान मुलांसाठी रहाटपाळणे तसेच विविध मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे कुटुंबासह यात्रा उत्सवाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. यात्रा उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज कुस्ती स्पर्धा, महाआरतीचे आयोजन यात्रेनिमित्त पादुका अभिषेक, कावड मिरवणूक, झेंडा मिरवणूक, महाआरती व जागरण-गोंधळ झाले. गुरुवारी महाआरती, महाप्रसाद व शोभेच्या फटाक्यांची आतबाजी करण्यात आली. शुक्रवारी कुस्ती स्पर्धा, महाआरती व धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेत रहाटपाळणे व विविध मनोरंजनाची साधने आली आहेत.
Source link
बुवासिद्ध देव यात्रा:कावड निघाली… राहुरी दुमदुमली! कावड, झेंडा मिरवणुकीसह धार्मिक कार्यक्रमांना भाविकांची गर्दी