Headlines

उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; एक ठार:वडील-भाऊ गंभीर जखमी; पाऊस, धुक्यामुळे वाळूजच्या बकवालनगरमध्ये दुर्घटना




सिडको वाळूज महानगरातून बजाज कंपनीत कामासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोखंडी सळयांनी भरलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने, २२ वर्षांचा तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याचे वडील आणि लहान भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे ५.५५ वाजेच्या सुमारास बकवाल नगर परिसरात घडली. भागवत भानुदास रेंगे (२२) असे मृत तरुणाचे नाव असून, ते मूळचे परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सध्या रेंगे कुटुंब सिडको वाळूज महानगर-१ मधील देवगिरी नगर येथे वास्तव्यास होते. अपघातात भागवत यांचे वडील भानुदास रेंगे आणि दुचाकी चालवणारा लहान भाऊ विशाल रेंगे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी पहाटे हे तिघेही दुचाकीवरून कंपनीत जात होते. त्यावेळी परिसरात पाऊस सुरू होता आणि धुक्यामुळे दृश्यमानता खूपच कमी होती. बकवाल नगर परिसरात रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक वेळेत न दिसल्याने त्यांची दुचाकी थेट ट्रकच्या मागील बाजूस आदळली. धडक इतकी भयंकर होती की भागवत यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, वाळूज पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तत्परतेमुळे जखमींना वेळेत उपचार : जिल्हा परिषद सदस्य तथा गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कृष्णा पाटील डोणगावकर हे पहाटे कामानिमित्त पुण्याकडे जात होते. वाटेत हा अपघात त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना आणि आपत्कालीन यंत्रणेला घटनेची माहिती दिली. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमी भानुदास आणि विशाल रेंगे यांना रुग्णालयात नेऊन वेळेत उपचार सुरू करणे शक्य झाले.
मृत भागवत रेंगे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *