![]()
टेलिग्रामच्या माध्यमातून आलेल्या चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या व्हिडिओंचा शौक एका तरुणाला महागात पडला आहे. अक्षय प्रकाशराव गायकवाड (२८, रा. साईनगर, भावसिंगपुरा) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर छावणी पोलिस ठाण्यात ‘पॉक्सो’ व ‘आयटी ॲक्ट’नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सायबर ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली. विशेष म्हणजे, आरोपी हा डी. फार्मसीचा विद्यार्थी असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. शहरातील एक तरुण इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करून चाइल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडिओ आणि फोटोंचा साठा करत आहे, तसेच ते इतरांना पाठवतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे संशयिताचा ‘आयपी ॲड्रेस’ आणि ई-मेल आयडी ट्रॅक करण्यात आला. त्यानंतर त्याला भावसिंगपुरा येथील घरातून ताब्यात घेतले. त्याच्या मोबाइलची तपासणी केली असता, त्यात चाइल्ड पॉर्नोग्राफीचे ४९० अश्लील व्हिडिओ आणि फोटो आढळून आले. हा सर्व डेटा त्याने पासवर्ड असलेल्या फोल्डरमध्ये लपवून ठेवला होता. या प्रकरणी सायबर ठाण्याचे हवालदार योगेश तळवंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास एपीआय विवेक जाधव करत आहेत. दरम्यान, आरोपी अक्षयला जन्मतःच एका डोळ्याची दृष्टी कमी होती आणि त्याचे काही वर्षांपूर्वी ऑपरेशन झाले असल्याची माहिती आहे. पॉक्सो, आयटी ॲक्टनुसार आरोपीवर गुन्हा दाखल कायदा काय सांगतो? इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे (मोबाइल, संगणक, इंटरनेट) बाल लैंगिक शोषणाशी संबंधित साहित्य शोधणे, पाहणे, डाउनलोड करणे, तयार करणे किंवा ते पसरवणे या सर्व बाबी ‘कलम ६७ बी’ अंतर्गत येतात. पहिल्या गुन्ह्यासाठी ५ वर्षांपर्यंतची कैद आणि ५ लाख रुपयांपर्यंतचा दंड, तर दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी ७ वर्षांपर्यंतची कैद आणि १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. अशी होते कारवाई केंद्रीय गृहमंत्रालयाचे पोर्टल आणि सायबर सेल हे आंतरराष्ट्रीय संस्थांशी जोडलेले आहेत. एखादी व्यक्ती डार्क वेब किंवा टेलिग्रामवरून चाइल्ड पॉर्नोग्राफी/अश्लील साहित्य डाउनलोड करते, तेव्हा त्या मोबाइलची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचते केंद्राकडून संबंधित राज्याच्या सायबर पोलिसांना माहिती पाठवली जाते. त्यानंतर कारवाई केली जाते. अशी घ्या काळजी टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘Auto-Download’ व ‘Save to Gallery’ हे पर्याय नेहमी बंद ठेवा. टेलिग्रामवर अश्लील कंटेंट, पायरेटेड चित्रपट किंवा डार्क वेबच्या लिंक्स देणाऱ्या कोणत्याही संशयित चॅनेल/ग्रुपमध्ये जॉइन होऊ नका. चुकून किंवा कोणीतरी पाठवलेला असा कोणताही व्हिडिओ किंवा फोटो आढळल्यास तो कोणालाही फॉरवर्ड करू नका, स्क्रीनशॉट काढू नका आणि मोबाइलमध्ये सेव्ह ठेवू नका. तो तत्काळ डिलीट करा.
Source link
टेलिग्रामद्वारे डी.फार्मसीचा विद्यार्थी चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या विळख्यात:490 अश्लील व्हिडिओ, फोटो मोबाइलमध्ये आढळले; तरुणावर गुन्हा