![]()
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग काहीसा मंदावला आहे. मात्र, गोदावरी खोऱ्यातील वरच्या धरणांतून अद्याप विसर्ग सुरू असल्याने पुढील काही दिवस धरणातील आवकमध्ये चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जायकवाडीत १४,०१३ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. यामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला असून, ५७.२६ टीएमसी (१६२१.६०३ द.ल.घ.मी.) जिवंत पाणीसाठा जमा झाला आहे. दरम्यान, आमदार विलास भुमरे यांनी शुक्रवारी धरणाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी उपलब्ध पाण्याचा साठा, आवक आणि कालव्यांद्वारे होणाऱ्या वितरणाचा आढावा घेतला. शेती, पिण्याचे पाणी व उद्योगांची गरज लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीप्रसंगी भूषण कावसानकर, तुषार पाटील, कार्यकारी अभियंता गणेश हासे, शाखा अभियंता मंगेश शेलार आणि गणेश खराडकर यांच्यासह पाटबंधारे विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. दोन दिवसांमध्ये साठा ८० टक्क्यांपर्यंत पोहोचणार नांदूर-मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ४९,३८२ क्यूसेक, पालखेड धरणातून २०,८८८ क्यूसेक आणि करंजवण धरणातून १५,४४० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच दारणा, कडवा व गंगापूर धरणांतूनही पाणी सोडण्यात येत असल्याने लवकरच जायकवाडीचा साठा ८० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मुख्य सांडव्यावरून पाणी सोडलेले नसून उजव्या व डाव्या कालव्यातून शेतीसाठी एकूण १,६८९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Source link
जायकवाडीत 14,177 क्युसेकने आवक:पाणीसाठा 75 टक्क्यांवर, आमदार विलास भुमरे यांनी धरणाला भेट देऊन केली पाहणी