![]()
जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग येथील जनार्दन स्वामी यांच्या प्रेरणेने श्री ज्ञानेश्वर आश्रमाचे परमपूज्य ज्ञानेश्वर माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी निघालेल्या पायी दिंडीचे जाफराबाद शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी झाली. जयघोष झाला. टाळ-मृदंगाचा गजर झाला. भक्तिमय वातावरणात नागरिकांनी दिंडीचे स्वागत केले. ३१ जुलै रोजी जवखेडा ठेंग येथील श्री ज्ञानेश्वर आश्रमातून सुमारे ५० तरुण वारकरी पायी दिंडीसह पाच ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी रवाना झाले. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा संदेश देणारी ही दिंडी सुमारे ५० ते ६० दिवसांचा प्रवास करणार आहे. दिंडी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार आहे. या पदयात्रेदरम्यान वारकरी जालना, हिंगोली, बीड, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतून प्रवास करणार आहेत. श्री क्षेत्र औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर आणि वेरूळ येथील घृष्णेश्वर या महाराष्ट्रातील पाच पवित्र ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणार आहेत. या धार्मिक यात्रेमुळे वारकरी संप्रदायाची परंपरा, अध्यात्म आणि सामाजिक ऐक्याचा संदेश जनमानसात पोहोचेल. शहरातील किशोरसिंग बायस, ॲड. राजेंद्र मगर, श्याम भाग्यवंत, अनिल मुळे, माधव जाधव, गणेश राऊत यांच्यासह अनेक भाविकांनी ज्ञानेश्वर माऊली यांचा सत्कार केला. जाफराबाद तालुक्यातून प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी पायी दिंडी निघाल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिंडीचे दर्शन घेण्यासाठी शहरातील नागरिकांनी रस्त्यांच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. दिंडीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले. या पायी दिंडीचा समारोप जवखेडा ठेंग येथील श्री जनार्दन स्वामी श्री ज्ञानेश्वर आश्रमात होणार आहे. यात्रेनंतर सर्व वारकरी तेथे एकत्र येणार आहेत. महाप्रसाद होणार आहे.
Source link
पायी दिंडी:महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग दर्शन पायी दिंडीचे जाफराबादला स्वागत