Headlines

जिल्हा परिषद सदस्य ज्योती शिंदे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र अवैध:जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिला निर्णय‎




छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गोलटगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या सदस्य ज्योती सुधाकर शिंदे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवून रद्द केले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे मूळ दाखला तात्काळ समितीकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे संभाजीनगर तालुका व राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ज्योती सुधाकर शिंदे (पूर्वाश्रमीच्या दहिहंडे ज्योती श्रीधर) यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये गोलटगाव गटातून इतर मागासवर्गीय महिला राखीव जागेवरून निवडणूक लढवली होती आणि त्या विजयीही झाल्या होत्या. निवडून आल्यानंतर नियमानुसार त्यांनी जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी जिल्हा जात पडताळणी समितीकडे अर्ज केला होता. या पडताळणी प्रक्रियेदरम्यान कारोळ (ता. संभाजीनगर) येथील माजी सरपंच सच्चिदानंद साहेबराव खलसे यांनी सदर जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आक्षेप घेत काही महत्त्वपूर्ण पुरावे समितीसमोर सादर केले. समितीने दोन्ही बाजूंचे लेखी म्हणणे, पुरावे आणि पोलिस उपाधीक्षक दक्षता पथकाचा गृह व शालेय चौकशी अहवाल विचारात घेतला. तसेच शिंदे यांची वैयक्तिक सुनावणीही घेतली. सुनावणीदरम्यान शिंदे यांना वडीलाकडील रक्ताच्या नातेवाइकांचे (वडील, चुलते, आत्या, आजोबा, पंजोबा) ‘कुणबी’ नोंद असलेले सबळ शालेय अथवा महसुली पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे त्या आपला जात दावा सिद्ध करू शकल्या नाहीत. यावरून पडताळणी समितीचे अध्यक्ष देवाप्पा गावंडे, सदस्य सचिव देविदास कोकाटे व सदस्य दीपक खरात यांच्या समितीने हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला. सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना ज्योती शिंदे या राखीव जागेवरून निवडून आल्यामुळे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर आता जिल्हा जात पडताळणी समिती आपला अहवाल विभागीय आयुक्तांकडे रीतसर सादर करणार आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यानुसार सदस्यत्व रद्द करण्याचा अंतिम अधिकार विभागीय आयुक्तांना असल्याने निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *