Headlines

रामलिंगेश्वरच्या पालखी प्रदक्षिणेने वेधले लक्ष:पारंपरिक वेशभूषेतील महिला, वारकऱ्यांच्या सहभागाने शहर गजबजले‎




लातूर शहरातील ऐतिहासिक गावभाग परिसरात विराजमान असलेले ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भागवत सप्ताहाची सांगता अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात झाली. सप्ताहाच्या सांगता दिनी काढण्यात आलेल्या श्रींच्या भव्य नगरप्रदक्षिणा दिंडीने संपूर्ण लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि ढोल-ताशांच्या तालावर निघालेल्या या दिंडीत वारकरी, महिला, तरुण-तरुणींसह हजारो भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. गावभाग परिसरातील श्री रामलिंगेश्वर देवस्थानच्या भागवत सप्ताहाला शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातून भाविकांचा दरवर्षीप्रमाणे यंदाही उदंड प्रतिसाद मिळाला. ३१ जुलै रोजी सकाळी मंदिराच्या प्रांगणातून पारंपरिक पूजेनंतर दिंडीचा अतिशय शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. सप्ताहातील दैनंदिन धार्मिक कार्यक्रमांनंतर सांगता दिनी श्रींच्या पालखीची भव्य नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. दिंडीदरम्यान शहरात कोणतीही वाहतूक कोंडी होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त होता. या दिंडीचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपारिक मराठमोळ्या वेशभूषेत अश्वांवर आरूढ झालेल्या तरुणी आणि टाळ-मृदुंग घेऊन चालणारे बाल वारकरी होते. तुळशीवृंदावण आणि डोक्यावर कलश घेतलेल्या महिलांची शिस्तबद्ध उपस्थिती भक्तीभाव द्विगुणित करत होती. हरिनामाचा गजर करत पुढे सरकणाऱ्या वारकऱ्यांच्या पथकाने आणि ढोल-बँड पथकांच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिरसपूर्ण झाला होता. श्री रामलिंगेश्वर मंदिरापासून निघालेली ही दिंडी खडक हनुमान, सुभाष चौक, गंज गोलाई, हनुमान चौक, महात्मा गांधी चौक आणि औसा हनुमान मार्गे फिरून पुन्हा रामलिंगेश्वर मंदिरापाशी पोहोचली, जिथे दिंडीचा सांगता समारोप झाला. नगरप्रदक्षिणेच्या संपूर्ण मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून भाविकांचे स्वागत करण्यात आले. गंजगोलाई परिसरातील व्यापाऱ्यांनी भाविकांसाठी अल्पोपहार व पाण्याची सोय केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *