![]()
घरातील किरकोळ भांडणामुळे २४ वर्षांपूर्वी निघून गेलेला मुलगा मतदार पडताळणी प्रक्रियेतील दुबार मतदारांचे नाव वगळण्याच्या प्रक्रियेमुळे आईला भेटला. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील मतदार यादीतील नवनाथ धोंडिबा गायकवाड हे नाव करमाळा तालुक्यातील केडगाव (त
.
मतदार पडताळणी मोहीम (एसआयआर) सुरू असून, याद्वारे दुबार नावाच्या मतदारांची पडताळणी केली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील बीएलओ शिक्षक अनिल भोंबे यांनी सोलापूर जिल्ह्यातील केडगाव (ता. करमाळा) येथील बीएलओ शिक्षक येताळा लगस यांना फोन केला होता. त्यातून ओळख पटली अन् २४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेले नवनाथ आई, भाऊ, बहिणीला भेटले. तब्बल २४ वर्षांनी भेटलेल्या नवनाथचा सुखी संसार पाहून आई, भाऊ यांना आनंद झाल्याचे दिसत होते.
लगस गुरुजींनी त्यांचे वर्गमित्र असलेले अशोक गायकवाड यांना फोन करून ही आनंदाची बातमी दिली. जेव्हा हा फोन आला, तेव्हा अशोक यांच्यावर पुणे येथील एका रुग्णालयात डायलिसिसचे उपचार सुरू होते. मात्र, २४ वर्षांपासून मृतवत समजलेला मोठा भाऊ जिवंत असल्याचे ऐकून त्यांनी उपचारांची पर्वा न करता तात्पुरते उपचार थांबवले.आई आणि बहिणीला सोबत घेऊन ते तातडीने मलकापूरच्या दिशेने रवाना झाले. विशेष म्हणजे, मलकापूरला पोहचेपर्यंत त्यांनी भावाला अजिबात फोनवर कल्पना दिली नाही. ते थेट शिक्षक अनिल भोंबे यांच्या मदतीने नवनाथ यांच्या घराच्या उंबरठ्यावर जाऊन धडकले.
नवनाथ यांच्या घरी जेव्हा हा भेटीचा सोहळा सुरू होता, तेव्हा नवनाथ यांच्या पत्नीला सुरुवातीला काहीच समजले नाही. परंतु, परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतर नवनाथ यांच्या मातोश्रींनी आपल्या जवळील स्वतःचे मंगळसूत्र सूनबाईंच्या गळ्यात घातले आणि नवनाथसह संपूर्ण कुटुंबाला गावी परतण्याची साद घातली. या क्षणी कठोर मनाचा नवनाथही पूर्णपणे भावनिक झाला. नवनाथला एक मुलगीही आहे.
या संपूर्ण भावनिक घटनेचे मुख्य साक्षीदार मतदार पडताळणी करणारे शिक्षक अनिल भोंबे ठरले. २४ वर्षांपूर्वी घरातील किरकोळ भांडणातून निघून गेलेले नवनाथ एसआयआर या पडताळणीमधून सापडले. शिक्षक अनिल भोंबे यांच्या तत्परतेने नवनाथची आई, भाऊ, बहिणीशी भेट घडली.