![]()
राज्य सरकारच्या बहुचर्चित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेसाठी सहकार विभागाने केलेल्या डेटा पडताळणीत तब्बल 94,083 शेतकरी ‘आयकरदाते’ असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे शेतकरी या कर्जमाफी योजनेसाठी अपात्र ठरले असून यामुळे राज्य सरकारचे तब्बल 1,881 कोटी 66 लाख रुपये वाचले आहेत. तर दुसरीकडे, छाननीनंतर पात्र ठरलेल्या 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, येत्या मंगळवारी (4 ऑगस्ट) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डीबीटी (DBT) द्वारे एकाच वेळी सुमारे 7 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात जमा केले जाणार आहेत. यासाठी शासनाने 30 जुलै 2026 रोजी 7 हजार कोटी रुपयांच्या निधी वितरणास प्रशासकीय मान्यता दिली आहे. योजनेचे स्वरूप आणि अटी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 36,585 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असून, सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्यांचे पीक कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना २ लाख रुपयांच्या मर्यादेत कर्जमाफी दिली जाईल. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या 24 लाख शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाईल. एकवेळ समझोता (OTS) 2 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांनी 2 लाखांवरील अतिरिक्त रक्कम बँकेत भरल्यास (31 मार्च 2027 पर्यंत मुदत), सरकार त्यांच्या खात्यात 2लाख रुपये जमा करेल. आधार प्रमाणीकरण अनिवार्य; आतापर्यंत 10 लाख शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण सहकार विभागातील सूत्रांनुसार, पहिल्या टप्प्यात 2 लाखांच्या आतील कर्जदार शेतकऱ्यांची यादी प्राप्तिकर विभागाकडे छाननीसाठी पाठवली होती. त्यात 94 हजार शेतकरी अपात्र ठरल्यानंतर, उर्वरित 16 लाख 96 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. त्यानुसार आतापर्यंत 10 लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. जे शेतकरी आधार प्रमाणीकरण पूर्ण करतील, त्यांच्या खात्यात पुढील 5 दिवसांत लाभाची रक्कम थेट जमा होईल. भंडारा जिल्ह्यात 137 कोटींची कर्जमाफी! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत भंडारा जिल्ह्यातील 22,365 शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांना एकूण 137 कोटी 13 लाख 33 हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांपैकी 75 टक्के शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. यासाठी जिल्ह्यातील 30,594 कर्जखात्यांची माहिती महाआयटी मार्फत पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. एनपीए कर्जखातेदारांनाही मोठा दिलासा ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केलेली नाही आणि ज्यांची खाती बुडीत (NPA) ठरली आहेत, त्यांच्यासाठीही राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एनपीएत गेलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज घेण्यास पात्र ठरवण्यासाठी व्याज सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. पीककर्ज जेवढे अधिक काळ थकलेले असेल, तेवढा शेतकऱ्यांवरील कर्जभार कमी होणार आहे आणि हा आर्थिक भार सरकार स्वीकारणार आहे. विशेष म्हणजे, बँकांनी एनपीए खातेदार शेतकऱ्यांना ‘कुलिंग पिरियड’ न ठेवता लगेच पुन्हा नव्याने कर्ज देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे या शेतकऱ्यांचा पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हेही वाचा.. पंतप्रधान अन् गृहमंत्री हरवले: मोदी-शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, ते संसदेत यायला घाबरतात का?, संजय राऊतांचा सवाल आम्ही सर्वांनी ठरवले आहे की देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले आहेत अशी जाहिरात द्यायची.संसदेचे अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सभागृहात उपस्थित राहिले नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात येण्यास घाबरत आहेत का? जर संसद चालवायचीच नव्हती, तर संसदेची नवीन इमारत कशासाठी उभारली? त्यांनी सोशल मीडियावरच संसद चालवावी, असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link
प्राप्तिकर भरणारे 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र:पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या जमा होणार 7 हजार कोटी