![]()
केंद्र सरकारच्या ई-20 या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणासह वाढती महागाई, बेरोजगारी आणि नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतला. नागपूरमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानावर युवक काँग्रेसने ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली असून, पोलिसांनी बॅरिकेडिंग करून हा मोर्चा मध्येच रोखला व अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ई-20 धोरणाला प्रामुख्याने विरोध या मोर्च्याचे प्रमुख कारण हे केंद्र सरकारचे ‘ई-20 इथेनॉल मिश्रित पेट्रोल’ धोरण असल्याचे सांगितले जात आहे. या धोरणामुळे सर्वसामान्यांच्या गाड्यांचे इंजिन खराब होत असून, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. “इथेनॉल निर्मिती करून गाड्यांचे आणि गोरगरिबांचे मोठे नुकसान केले आहे, त्यामुळे नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा,” अशी आक्रमक मागणी कार्यकर्त्यांनी केली. यासह महागाई, बेरोजगारी आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी जोडला गेलेला ‘नीट’ पेपरफुटीचा विषय यांवरूनही मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न या आंदोलनाद्वारे करण्यात आला. धर्मेंद्र प्रधान झाकी है…ची घोषणाबाजी या मोर्चामध्ये तरुण वर्गाचा आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. अलीकडेच दिल्लीतील जंतरमंतरवर शिक्षणमंत्र्यांविरोधात झालेल्या आंदोलनाचा संदर्भ देत आंदोलकांनी हातात फलक घेतले होते. “धर्मेंद्र प्रधान तो बस झाकी है, गडकरी-मोदी बाकी है,” अशा आशयाचे फलक घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते गडकरींच्या घराकडे निघाले होते. पोलिसांची तगडी नाकेबंदी आणि झटापट या आंदोलनाची पूर्वकल्पना असल्यामुळे पोलिसांनी गडकरींच्या निवासस्थानाकडे (देवगिरी बंगल्याकडे) जाणाऱ्या सर्व मार्गांवर म्हणजेच चिटणीस सेंटर ते शिवाजी चौकादरम्यान मोठी नाकेबंदी केली होती. मोर्चेकरी जेव्हा बॅरिकेड्सजवळ पोहोचले, तेव्हा त्यांनी ती तोडण्याचा आणि थेट बॅरिकेड्सवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी थेट बॅरिकेड्सवर चढून घोषणाबाजी सुरू केली. पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला. पोलिसांनी बॅरिकेड्सवर चढलेल्या कार्यकर्त्यांना उचलून थेट पोलिसांच्या व्हॅनमध्ये कोंबले. या झटापटीत पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. विनापरवाना मोर्चा; आंदोलकांना घेतले ताब्यात घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या मोर्च्याला पोलिसांची पूर्वपरवानगी नव्हती. “युवक काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या या मोर्च्याला कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे आम्ही सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे,” असे पोलिसांनी स्पष्ट केले. यानंतर उर्वरित मोर्चेकऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी पुन्हा काँग्रेस भवनच्या दिशेने माघारी पाठवले. ‘ई-20’ पेट्रोलच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या नाराजीला युवक काँग्रेसने रस्त्यावरील आंदोलनाचे रूप देत थेट नितीन गडकरी यांना लक्ष्य केले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा मोर्चा त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकला नाही. हेही वाचा… ‘पालकमंत्री करा’च्या मागणीवर छगन भुजबळांची सावध भूमिका: म्हणाले- ‘फ्लेक्स काढायला सांगितले, नाशिकच्या खड्ड्यांकडे लक्ष द्या’ नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ‘छगन भुजबळांना पालकमंत्री करा’ अशी मागणी करणारे होर्डिंग लावल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, या मागणीपासून स्वतःला दूर ठेवत मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित फ्लेक्स तत्काळ काढण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ म्हणाले, “भुजबळांना पालकमंत्री करा, याचा अर्थ मीच पालकमंत्री व्हावे असा नाही. ज्यांनी माझ्या नावाचे फ्लेक्स लावले, त्यांच्याबद्दल मी नापसंती व्यक्त केली असून ते तत्काळ काढण्यास सांगितले आहे.” येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
नागपुरात नितीन गडकरींच्या घरावर युवक काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा:बॅरिकेडिंगवर चढत घोषणाबाजी, अनेक कार्यकर्ते ताब्यात