![]()
टीआरपीच्या वाढत्या स्पर्धेमुळे वाहिन्यांनी नव्या मालिकांचा धडाका लावला असून, याचा फटका डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेला बसला. वाहिनीने अवघ्या पाच महिन्यांत आणि 152 भागांतच या मालिकेला अचानक निरोप दिला. मात्र, मालिका अशा प्रकारे बंद झाल्यानंतर यातील मुख्य अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ती कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवण्याचा ठाम निश्चय केला आणि त्यांच्या याच जिद्दीमुळे टेलिव्हिजनवर मालिका बंद झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसांतच ती यूट्यूबच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरून निरोप घेतल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत ‘मराठी वारसा’ या यूट्यूब चॅनेलवरून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेली डॉ. अमोल कोल्हे यांची निर्मिती आणि मुख्य भूमिका असलेली ‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ ही मालिका सध्या डिजिटल माध्यमावर नवे रेकॉर्ड बनवत आहे. आतापर्यंत ही मालिका दर सोमवार, बुधवार आणि शनिवार अशी आठवड्यातून तीनच दिवस संध्याकाळी प्रसारित होत होती. मात्र आता या मालिकेसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला असून, प्रेक्षकांसाठी ही मालिका आता आठवड्यातील सहा दिवस प्रसारित केली जाणार आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘मराठी वारसा’ या यूट्यूब चॅनेलनंतर आता ‘अनमोल भारत’ या नव्या चॅनेलची घोषणा केली आहे. यापुढे ‘मराठी वारसा’ चॅनेलवरून महाराष्ट्राचा इतिहास, महापुरुषांचे महान विचार आणि प्रेरणादायी कथा पूर्वीप्रमाणेच सादर केल्या जातील. मात्र या जोडीला आता ‘अनमोल भारत’ या नवीन चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण देशाचा प्रदीर्घ इतिहास, आपले अनमोल सांस्कृतिक वैभव आणि भारताचा समृद्ध वारसा अधिक व्यापक व भव्य स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला मुख्य संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काय म्हणाले अमोल कोल्हे? अमोल कोल्हे म्हणाले, अनमोल भारत’ या व्यासपीठावर भगवान बुद्ध, महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद यांच्यासह विविध क्षेत्रांतील महान व्यक्तिमत्त्वांच्या कथा जागतिक दर्जाच्या सादरीकरणातून मांडल्या जाणार आहेत. इतिहास केवळ सांगायचा नाही, तर तो सिनेमॅटिक अनुभवातून जिवंत करायचा, अशी या उपक्रमामागील भूमिका आहे. प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, मराठी वारसा’ सुरू केले, तेव्हा आपल्या महापुरुषांचे विचार आणि संघर्ष नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा आमचा ध्यास होता. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच ‘अनमोल भारत’चा जन्म झाला आहे. आमचा उद्देश कोणत्याही एकाच विचारधारेचा प्रचार करण्याचा नाही. तर इतिहासाकडे वस्तुनिष्ठ नजरेने पाहण्याचा आहे. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, तथ्यांच्या आधारे मांडणी आणि उच्च दर्जाच्या निर्मितीतून प्रेरणादायी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. मालिकेचे कौतुक अजूनही दबक्या आवाजात मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. त्यामुळेच आता ही मालिका आठवड्यातील सहा दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या प्रयोगाबद्दल आणि मालिकेला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल इंडस्ट्रीतील अनेक मंडळी वैयक्तिक स्वरूपात माझ्याशी संपर्क साधून कौतुक व्यक्त करत आहेत. मात्र, हे कौतुक अजूनही दबक्या आवाजात होत असल्याचे कोल्हे म्हणाले. अमोल कोल्हे म्हणाले, यूट्यूबच्या माध्यमातून मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आणि त्याला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद याविषयी खुलेपणाने फारसे बोलले जात नाही. तरीही प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद आम्हाला योग्य दिशेने वाटचाल करत असल्याची खात्री देतो आणि नवी ऊर्जा देतो, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.
Source link
TV वर बंद, पण यूट्यूबवर सुपरहिट!:डॉ. अमोल कोल्हेंची 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका आता आठवड्याचे 6 दिवस