Headlines

माजी पोलीस अधिकाऱ्याकडून सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याचा आरोप:पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये पार्किंगवरून वाद, सीसीटीव्ही फुटेज समोर




पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या प्रवेशद्वारावर पार्किंगच्या कारणावरून माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे आणि सुरक्षारक्षक यांच्यात झालेल्या वादाचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यामध्ये सुरक्षारक्षकाला मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात स्वतः निवृत्त पोलीस अधिकारी यांनीच पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्याने नेमके काय प्रकार घडले, याचा तपास डेक्कन पोलिस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भानुप्रताप बर्गे हे गोखले इन्स्टिट्यूटमध्ये वाहन पार्क करण्यासाठी गेले होते. पार्किंग पूर्ण भरले असल्याचे सुरक्षारक्षकाने सांगून वाहन आत न घेण्यास सांगितल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हा वाद धक्काबुक्की आणि मारहाणीपर्यंत पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दरम्यान, डेक्कन पोलिस ठाण्यातील अदखलपात्र तक्रारीच्या अहवालानुसार, गोखले इन्स्टिट्यूटचे सुरक्षारक्षक सत्यवीर सिंग यांनी भानुप्रताप बर्गे यांनी शिवीगाळ करून मारहाण व धमकी दिल्याची तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दुसरीकडे, भानुप्रताप बर्गे यांनीही व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडली असून, सुरक्षारक्षकांनीच त्यांच्याशी गैरवर्तन करत धक्काबुक्की केल्याचा दावा केला आहे. याबाबत त्यांनीही डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेबाबत गोखले इन्स्टिट्यूटकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सीसीटीव्ही फुटेज आणि दोन्ही बाजूंच्या तक्रारींच्या आधारे डेक्कन पोलिस पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *