Headlines

एफडीएचा आदेश धाब्यावर; ग्राहकांच्या टेबलवर थेट 20 रुपयांची बाटली:ग्राहकांच्या टेबलवर‎न मागता वेटरने दिली बाटली‎




अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये मोफत सुरक्षित पिण्याचे पाणी देणे आणि त्याचा स्पष्ट फलक लावणे बंधनकारक केले आहे. मात्र, शहरात या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आले. हॉटेलमध्ये प्रवेश करताच वेटर कोणताही प्रश्न न विचारता थेट २० रुपयांची सीलबंद पाण्याची बाटली टेबलवर ठेवतात. मोफत साध्या पण शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा कोणताही सूचना फलक लावलेला दिसत नाही. ग्राहकाने विचारणा केलीच, तर नाखुशीने साधे पाणी दिले जाते किंवा स्वतः जाऊन घेण्यास सांगितले जाते. बहुतांश ग्राहक संकोचापोटी किंवा अनवधानाने बाटलीचे पैसे मोजतात. यामुळे एफडीएचे आदेश केवळ कागदावरच राहिले असून ग्राहकांच्या खिशाला उघडपणे झळ बसताना दिसत आहे. प्रशासनाने यावर कडक कारवाई करण्याची गरज सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे. . केस २ : ग्रामीण भागातही पॅकेज्ड पाणी शहराप्रमाणे ग्रामीण भागातील हॉटेल्समध्येही ग्राहक आला की टेबलवर थेट पॅकेज्ड वॉटर बॉटलच टेबलवर येते. लोणीमधील एका नामांकित हॉटेलमध्ये गेल्यानंतर हा अनुभव आला. वेटरने थेट मिनिरल वॉटर बॉटल आणून दिली. विचारणा केल्यानंतर आश्र्चर्यचकीत होऊन वेटरने दोनदा विचारले, ‘काय साधे पाणी’? उत्तर होय म्हणून दिल्यानंतरही शुद्ध पण साधे पिण्याचे पाणी आणून दिले गेले नाही. शेवटी मिनिरल वॉटर बॉटलवरच तहान भागवावी लागली. . केस ३ : मागितले पाणी, आणली थेट बाटली कोठी रस्ता भागात एका हॉटेलमध्ये दुपारच्या वेळी मोठी गर्दी होती. मोजकेच टेबल रिकामी होती. बहुतांश टेबलवर पॅकेज्ड वॉटरच्या बाटल्या दिसत होत्या. प्रतिनिधीने पाण्याची मागणी करताच वेटरने कोणतीही विचारणा न करता थेट पाण्याची बाटली आणून दिली. त्यानंतर साधे पाणी हवे असल्याचे सांगितल्यानंतर जारमधील पाणी उपलब्ध करून देण्यात आले. दिल्लीगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये बाहेरच्या बाजूस पाण्याचे जार दिसले. मात्र, हॉटेलात बहुतांश ग्राहकांच्या टेबलवर पॅकेज्ड पाण्याच्या बाटल्या होत्या. प्रतिनिधीने पाणी मागितल्यानंतर वेटरने बाटली देण्याची तयारी केली. त्यावेळी ‘साधे शुद्ध पाणी हवे’ अशी मागणी केली . त्यावर ‘बाहेरून तुम्ही स्वतः घ्या,’ असे सांगण्यात आले. आग्रह केल्यानंतर वेटरने जारमधील पाणी दिले. एफडीएने मोफत शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे निर्देश दिले असताना, प्रत्यक्षात ग्राहकांना पॅकेज्ड पाणी देण्याची पद्धत कायम असल्याचे या पाहणीत दिसून आले. साधे पाणी असतानाही ग्राहकाला त्याची मागणी करावी लागते, हा या पाहणीतील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे एफडीएच्या आदेशानंतर हॉटेलांत मोफत पाण्याची व्यवस्था आणि त्याची माहिती ग्राहकांना दिली जात आहे का, याची प्रशासनाने तपासणी करण्याची गरज आहे. ^शहरातील उपहारगृहे, हॉटेलमध्ये ग्राहकांना शुध्द पाणी देणे बंधनकारक आहे. व्यावसायिकांनी याची अमंलबजावणी न केल्यास ग्राहक अन्न-औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार करु शकतात. याची खातरजमा केल्यानंतर संबधितांची चौकशी केली जाईल. गौरव जगताप, सहाय्यक आयुक्त, अन्न-औषध प्रशासन,नगर शहर.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *