![]()
तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे स्थानिक जलप्रकल्पांमध्ये समाधानकारक पाण्याची आवक झाली आहे. पालोद येथील खेळणा मध्यम प्रकल्पात सोमवारी ४८ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे सिल्लोड शहरासह परिसरातील १२ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुर्तास तरी सुटला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे मुर्डेश्वर येथील लघु प्रकल्प भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे खेळणा नदीला मोठा पूर आला. याशिवाय केळगाव लघु प्रकल्पाच्या सांडव्याचे पाणीही नदीपात्रात जमा होत असल्याने खेळणा मध्यम प्रकल्पात जलसाठा वेगाने वाढत आहे. या धरणातून सिल्लोड शहरासह भराडी, मोढा, वांगी, मंगरूळ, चिंचपूर, चांदापूर, पालोद, मांडणा, उंडणगाव, लिहाखेडी, पांगरी आणि नानेगाव या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. काही दिवसांपूर्वी तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. सुमारे २६ गावांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र, नुकत्याच झालेल्या पावसामुळे पाणीस्रोत जिवंत झाल्याने पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागानुसार सध्या सर्व टँकर बंद झाले आहेत. खेळणा प्रकल्पात सध्या ४८ टक्के पाणी आले असून आगामी काळात उर्वरित पावसामुळे धरण १०० टक्के भरेल असा विश्वास आहे. पाणी गढूळ असल्याने शुद्धीकरणास वेळ लागत आहे. तरीही सिल्लोड शहराला कोणत्याही परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांनी दिले. आत्तापर्यंत ४४१.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अजिंठा अंधारी, निल्लोड, चारनेर, उंडणगाव आणि रहामाबाद या लघु प्रकल्पांतही पाण्याची आवक सुरू झाली असली, तरी हे सर्व प्रकल्प पूर्ण भरण्यासाठी पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, धरणात नव्या पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने पाणी गढूळ झाले आहे. शुद्धीकरणास जास्तीचा वेळ लागत असल्याने शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. आतापर्यंत ४४१.२५ मिमी पावसाची नोंद
Source link
खेळणा प्रकल्पात 48 % साठा:सिल्लोडसह 12 गावांवरील पाणी संकट टळले, सततच्या पावसाने पाण्याची आवक, मोठ्या पावसाची प्रतीक्षा