![]()
‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष, एक जीवन’ या राज्यव्यापी पर्यावरण जनजागृती मोहिमेंतर्गत पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील आनंदवन परिसरात विविध प्रकारच्या १७५ वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अधिकाधिक नागरिकांनी वृक्
.
शिक्षक संदीप राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने श्रमदान, लोकसहभाग आणि निसर्गप्रेमाच्या बळावर आनंदवनाची उभारणी केली आहे. आज या परिसरात तब्बल ३५ हजारांहून अधिक झाडे डौलाने उभी आहे. विविध देशी-विदेशी वृक्षप्रजातींसह औषधी वनस्पतींचीही लागवड करण्यात आली आहे. तसेच जैवविविधतेला चालना देण्यासाठी मियावाकी पद्धतीने घनदाट जंगलाची निर्मिती करण्यात आली असून, हा परिसर आता पक्षी, फुलपाखरे आणि वन्यजीवांसाठीही आश्रयस्थान ठरत आहे. आषाढी एकादशीला आनंदवनात बांबू उद्यानाचा शुभारंभ करण्यात आला होता. भारतीय वनसेवा (आयएफएस) अधिकारी अक्षय पवार, तेजस पटवा आणि कृष्णा साठे यांच्या उपस्थितीत २५ बांबूंच्या रोपांची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला. यापूर्वी जून महिन्यात आयोजित आनंदवन निसर्ग श्रमसाधना शिबिरात सुमारे २०० झाडे लावण्यात आली होती.आता ‘दिव्य मराठी’च्या ‘एक वृक्ष, एक जीवन’ मोहिमेत सहभागी होत पुन्हा विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. वाढते तापमान, हवामान बदल आणि जंगलांची घटती संख्या लक्षात घेता प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
आनंदवनाचा हा हरित उपक्रम केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित नसून, विद्यार्थी, युवक आणि ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणारे केंद्र बनले आहे. लोकसहभागातून उभे राहिलेले हे हरितविश्व ग्रामीण भागातील पर्यावरण संवर्धनाचे प्रेरणादायी मॉडेल म्हणून ओळख निर्माण करत आहे. लोकसहभागातून उभे राहिलेले हे हरितविश्व ग्रामीण भागातील पर्यावरण संवर्धनाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत असून, ‘एक वृक्ष, एक जीवन’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचवणारे आदर्श केंद्र म्हणून आनंदवनाची ओळख निर्माण होत आहे.