Headlines

पुण्यात पादचारी ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावली:अडीच लाखांचा मुद्देमाल लांबवून चोरटे पसार, बिबवेवाडीतील प्रकार




बिबवेवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला मार्केट यार्डमधील प्रेमनगर सोसायटीत राहतात. बिबवेवाडी-मार्केट यार्ड रस्त्याने पायी जात असताना, रस्ता ओलांडण्यासाठी त्या कडेला थांबल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मार्केट यार्ड-बिबवेवाडी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक एन. कांबळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गांजा पिणाऱ्या दोघांकडून तरुणाला मारहाण दरम्यान, भवानी पेठेतील काशेवाडी भागात गांजा ओढणाऱ्या दोघांना हटकल्याने एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आकाश किसन कोळी (वय 27, रा. एकबोटे कॉलनी, घोरपडे पेठ) यांनी या संदर्भात खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, ऋतिक मिसाळ आणि धर्मा लोंढे (दोघे रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोनमर्ग चित्रपटगृहाजवळील एका गल्लीत सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढत होते. त्यावेळी कोळी यांनी त्यांना ‘सार्वजनिक रस्त्यावर गांजा ओढू नका, महिलांना त्रास होतो’ असे सांगितले. यावरून आरोपींनी कोळी यांना शिवीगाळ करत रस्त्यावर पडलेल्या कौलाने त्यांच्या डोक्यात मारहाण केली, ज्यात ते जखमी झाले. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिस हवालदार मोहन येलपले या प्रकरणाचा तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *