![]()
सिंधू नगर येथील पूज्य शिवधारा आश्रमात सुरू असलेल्या श्री झूलेलाल चालिहा महोत्सवाच्या १९व्या दिवशी आयोजित सत्संग प्रवचनात परमपूज्य संत डॉ. संतोष देवजी महाराज यांनी श्रावण महिन्यातील शिवभक्तीचे महत्त्व विशद करत श्रद्धा, विश्वास आणि अखंड भक्तीच्या बळावर जीवनातील संकटांवर मात करता येते, असा संदेश दिला. यावेळी डॉ. संतोष देवजी महाराज यांनी “ॐ नमः शिवाय’ या मंत्राच्या जपाचे महत्त्वही सांगितले. या मंत्राच्या नियमित जपामुळे मनःशांती लाभते, भक्ती व आत्मिक शक्ती वाढते, नकारात्मकता दूर होते आणि मोक्षमार्ग सुलभ होतो, असे त्यांनी नमूद केले. प्रवचनादरम्यान त्यांनी शलाद ऋषी आणि नंदीश्वर यांची प्रेरणादायी कथा सांगितली. शलाद ऋषींनी भगवान शिवांची कठोर तपश्चर्या करून विवाहाशिवाय पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या तपामुळे दिव्य बालकाचा जन्म झाला आणि त्याचे नाव नंदी ठेवण्यात आले. अल्पायुष्याचे भाकीत समोर असतानाही नंदीने भगवान शिवांवरील अढळ विश्वास कायम ठेवत अखंड शिवभक्ती केली. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्याला दर्शन देत आपले वाहन, कैलास पर्वताचा द्वारपाल आणि ‘नंदीश्वर’ म्हणून अजर-अमरत्वाचे वरदान दिले. नंदीश्वराच्या कानात सांगितलेली प्रार्थना थेट भगवान शिवांपर्यंत पोहोचते, अशी श्रद्धा असल्याचेही त्यांनी सांगितले. या कथेतून संकटसमयी श्रद्धा आणि विश्वास ढळू न देता ईश्वरभक्ती कायम ठेवण्याचा संदेश मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले. १००८ गुरु स्वामी शिवभजनजी महाराज यांच्या शिकवणीचा उल्लेख करत, भगवान शिव अत्यंत सहज प्रसन्न होणारे देव असून केवळ श्रद्धेने अर्पण केलेल्या एका लोटा जलानेही मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असे सांगण्यात आले. मोफत आरोग्य तपासणी शिबिर दरम्याना पूज्य शिवधारा आश्रम व शिवधारा मिशन फाउंडेशनच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वातरोग तपासणी शिबिर तसेच लठ्ठपणा, मधुमेह, थायरॉईड आदी आजारांवरील उपचार शिबिराचा समावेश होता. तज्ज्ञ डॉ. अक्षय भारती आणि डॉ. शुभांगी भारती यांनी आपली सेवा दिली. या शिबिरांचा समाजबांधवांनी लाभ घेतला. संस्थेच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
Source link
‘अखंड भक्तीच्या बळावर संकटांवर मात करावी’:शिवधारा आश्रमात डॉ. संतोष देवजी महाराजांचा संदेश