Headlines

नांदगाव तालुक्याला विशेष पॅकेज द्या; नुकसान भरपाईसाठी पुढाकार:तालुक्यातील शेतकरी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात‎




अलिकडेच झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण पिके खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक नागरिकांचे घरात पाणी शिरल्याने घरेही जमीनदोस्त झाली. घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. त्यामुळे सरकारच्या परंपरागत (एनडीआरएफ) निकषानुसार मदत न देता ‘विशेष पॅकेज’ द्या अशी मागणी पुढे आली आहे. त्यासाठी शिवसेना (उबाठा) चे समन्वयक व नांदगाव नगरपंचायतीचे गटनेते प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वातआज, गुरुवारी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गेल्या आठवड्यात ३० व ३१ जुलै रोजी नांदगाव तालुक्यात सतत ३५ तास मुसळधार पावसाने कहर केला. या काळात थेट २९६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात नदीच्या पुराचे पाणी साचल्याने शेतात तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची उभी पिके जमीनीसह खरडून गेल. सोयाबीन, कापूस, तूर, फळपीक, भाजीपाला इत्यादी पिके जळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात उत्पादन होणार नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान नांदगाव तालुक्यात झाले असून मंगरुळ चव्हाळा, धामक, धानोरा शिक्रा, शिवणी व नांदगाव शहरातील शेकडो नागरिकांचे घरात पाणी गेल्याने घरातील संपूर्ण अन्नधान्य, कपडे, भांडे, विद्यार्थ्यांची पुस्तके नेस्तनाबूत झाली. अनेकांचे संसार उघड्यावर आले. राहायला घर राहिले नाही. या पार्श्वभूमीवर शासनाने तुटपुंजी मदत न करता नुकसान भरपाईसाठी तालुक्याला विशेष मदतीचे पॅकेज देणे क्रमप्राप्त ठरते, असा विचार यावेळी मांडण्यात आला. यावेळी मारोटकर यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव संतोष सुरजुसे, शिवसेनेचे बाळासाहेब राणे, शेतकरी सुनील गुरमुळे, वासुदेव लोखंडे, गुणवंत चांदुरकर, रमेश मांडवगडे, प्रकाश ब्राम्हणवाडे, सुनील ब्राह्मणवाडे, गजानन मारोटकर, लोकेश उटबगले, रवि ठाकूर, दामोधर ब्राह्मणवाडे, बाळा सुने, बाबराव राऊत, विजय सुने, वाल्मिक दहातोंडे, सुरेंद्र गावफळे, नितीन दुधे, शंकर मांडवगडे, विजय पेटले, पंकज पिंपळकर आदी उपस्थित होते. शेतातील पिकांसोबतच शेती उपयोगी स्पिंकलर पाईप, टिनपत्रे, ताराचे कुपन, बांधलेल्या विहिरी सुध्दा खचल्या. पाण्याची मोटर कृषी पंपाचे इलेक्ट्रिक पोल पडले आणि सोलरचे कृषी पंप खराब झाले. कांदा चाळ मधील कांदा खराब झाला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील गायी, बैल, बकऱ्या, कोंबड्यासुद्धा वाहून गेल्या. शेतात जाणारे पाणंद रस्ते, पूल, बंधारे, छोटे नाले, डांबरी रस्ते पूर्ण वाहून गेले. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *