![]()
पवना धरणातून थेट बंदिस्त पाईपलाईन टाकण्याच्या राज्य सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेविरोधात मावळ तालुक्यातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असून, हजारो शेतकऱ्यांच्या सहभागाने एक विराट ‘लॉन्ग मार्च’ काढण्याची घोषणा करण्यात आली आहे.यापूर्वी मावळ येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकरी शहीद झाले होते. 2 ऑक्टोबर रोजी त्याच ऐतिहासिक ठिकाणाहून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पवना धरणापर्यंत या ‘लॉन्ग मार्च’ची सुरुवात केली जाईल, अशी माहिती राजू शेट्टी यांनी मावळ पंचायत समिती येथील पत्रकार परिषदेत दिली.यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणी देण्यास त्यांचा अजिबात विरोध नाही. मात्र, नदीपात्राऐवजी थेट बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी नेण्यास शेतकरी आणि स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. यामुळे पवना नदीचा नैसर्गिक प्रवाह थांबून शेती आणि मावळ तालुक्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवड आणि मावळ तालुक्यातील काही लोकप्रतिनिधींना या बंदिस्त पाईपलाईनच्या कामातून शेकडो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करायचा आहे. याच स्वार्थापोटी हा अवाजवी प्रकल्प जनतेवर लादला जात असल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 1970 सालापासून, म्हणजेच गेल्या 56 वर्षांहून अधिक काळ, पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. हक्काच्या पुनर्वसनासाठी पिढ्यानपिढ्या संघर्ष करावा लागत असताना, शासन आणि लोकप्रतिनिधी विकासकामांच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.या संपूर्ण वादात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. पवना धरणातील शेकडो एकर जमीन बड्या उद्योगपतींना भाडेतत्त्वावर (लीजवर) देण्याचा घाट राज्य सरकारने घातला असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मूळ भूमिपुत्रांना आणि धरणग्रस्तांना न्याय मिळत नसताना उद्योगपतींचे खिसे भरले जात असल्यामुळे मावळ तालुक्यात संताप उसळला आहे.
Source link
पवना पाईपलाईनला मावळमधील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध:राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली 2 ऑक्टोबरला 'लॉन्ग मार्च'ची घोषणा