नंदुरबारसह संपूर्ण जळगाव आणि धुळे जिल्ह्यांच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या कथित ध्वनीफित प्रकरणी भाजपचे माजी प्रदेश महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांना अखेर अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या चौधरी यांना
.
काय आहे नेमके प्रकरण?
गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप्स वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहेत. या क्लिप्समध्ये त्यांनी आपल्याच पक्षातील महिला नेत्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह, धक्कादायक आणि जातीवाचक विधाने केल्याचा आरोप आहे.
रक्षा खडसेंबद्दल अपशब्द
एका क्लिपमध्ये चौधरी हे मंत्री गिरीश महाजन यांच्याशी बोलत असल्याचा दावा आहे. यात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द आणि शिवीगाळ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संभाषणादरम्यान मंत्री महाजन यांनी चौधरी यांना एकदाही न अडवल्याने या क्लिपची मोठी राजकीय चर्चा झाली.
डॉ. हिना गावित यांच्यावरही आक्षेपार्ह टिप्पणी
माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्याबाबतही जातीवाचक आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली.
गुन्हे दाखल आणि पोलिसांची कारवाई
रक्षा खडसे यांनी याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केली नसली तरी, गावित कुटुंबाने याविरोधात कठोर पाऊल उचलले. डॉ. हिना गावित यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून विजय चौधरी यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात ‘अॅट्रॉसिटी’ (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय, सामाजिक कार्यकर्त्या मालती वळवी यांनीही स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत विजय चौधरी यांच्यावर सुमारे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.
प्रकरणाला वेगळे वळण; एआय (AI) चा वापर आणि स्वीय सहाय्यकाचा सहभाग
या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळाले आहे. संबंधित ऑडिओ क्लिप्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून फेरफार केलेल्या असल्याचा दावा काही नेत्यांनी केला आहे. या कथित क्लिप्समध्ये मंत्री जयकुमार रावल, आमदार आमश्या पाडवी, राजेश पाडवी, अमरीश पटेल यांच्यासारख्या बड्या नेत्यांचाही संदर्भ असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, विजय चौधरी यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार, चौधरी यांच्या मोबाईलमधील ध्वनीफिती त्यांच्या स्वीय सहाय्यकाने (PA) चोरी करून आणि इतरांना विकून समाजमाध्यमांवर पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वीय सहाय्यकाला अटकही करण्यात आली होती, आणि चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याला जामीन मंजूर झाला आहे. सध्या दररोज नवनवीन ऑडिओ क्लिप्स व्हायरल होत असल्याने अनेक नेत्यांची बदनामी होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, या हाय-प्रोफाईल प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने आणि गांभीर्याने सुरू आहे.
हेही वाचा..
रक्षा खडसेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात मोठी कारवाई: भाजप नेते विजय चौधरींच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याचा आरोप असलेल्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. भाजप नेते विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी पोलिसांनी पहिली मोठी कारवाई करत त्यांचे स्वीय सहाय्यक (पीए) यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी