Headlines

फसवणूक करणाऱ्या टोळीवर 'मोका' अंतर्गत कारवाई:चारपट पैसे देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना लुबाडले




नागपूर शहर पोलिसांनी नागरिकांना चारपट पैसे करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या एका टोळीविरुद्ध ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९’ (मोका) अंतर्गत कठोर कारवाई केली आहे. या टोळीचा प्रमुख परवेज अहमद पटेल याच्यासह एकूण सात साथीदारांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने यवतमाळ येथील रहिवासी निखील आकाश चौहाण (वय ४०) यांना ५० हजार रुपयांच्या बदल्यात चारपट पैसे देण्याचे आमिष दाखवले होते. १७ जून २०२६ रोजी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपींनी चौहाण यांच्याकडून ५० हजार रुपये रोख घेतले आणि त्यांना नोटांच्या आकाराचे कागदी बंडल देऊन फसवणूक केली. या घटनेची तक्रार प्राप्त होताच नंदनवन पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली. तपासादरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक साधने आणि गुन्ह्यात वापरलेले इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली असून, ते सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. टोळीप्रमुख परवेज अहमद मो. शरीफ पटेल (वय ५०, रा. हसनबाग, नागपूर) आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, फसवणूक, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि बनावट दस्तऐवज तयार करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये परवेज अहमद मो. शरीफ पटेल (वय ५०, रा. हसनबाग, नागपूर – टोळी प्रमुख), अवतार सिंग जग्गू सिंग जुनी (वय ५०, रा. चंकापूर, चंद्रपूर), शाहरूख खान मतलब खान (वय ३१, रा. घुगुस, चंद्रपूर), अंकित लीलाधर वासनिक (वय ३०, रा. तुमसर, भंडारा), अंकित राजेंद्र सूर्यवंशी (वय ३५, रा. बैतूल, मध्य प्रदेश), मोहम्मद मन्नन मोहम्मद इद्रीस शेख (वय ३१, रा. खरबी, नागपूर) आणि अदनान उर्फ आशू रोशन खान (वय ३५, रा. नंदनवन, नागपूर) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, नरेश बुचके (रा. बेलखेडा, जिंतूर, परभणी) आणि पुवेनाला पाटील (रा. हिंगोली) या दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *