![]()
शहरात अतिक्रमणांची समस्या अतिशय गंभीर झाली आहे. रस्त्याच्या कडेला किंवा जागा दिसेल तिथे अतिक्रमणे केली जातात. काहींनी पक्के शेड ठोकून अतिक्रमणे केली आहेत. अशा सर्व अतिक्रमणांविरुद्ध महापालिका प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांत शहराच्या विविध भागात तोडकाम करुन मनपा प्रशासनाने रस्त्यांच्या कोंडलेला श्वास मोकळा केला आहे. त्याचवेळी नाल्या, सरकारी कार्यालयाच्या भिंती आदी सार्वजनिक जागांवर केलेले अतिक्रमणही दूर केले आहे. विशेषत: निवासी भागात केलेल्या अतिक्रमणांमुळे परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. तोडकाम केल्याने त्यांनाही दिलासा मिळाला आहे. पालिका आयुक्त महेश गोंदावले यांच्या आदेशानुसार सुरु झालेल्या या कारवाई अंतर्गत सिद्धार्थनगरमध्ये सुमारे २२ नागरिकांद्वारे करण्यात आलेले सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटविण्यात आले. सदर अतिक्रमणामुळे लगतचे परिसरामध्ये पावसाची पाणी साचून अडथळा निर्माण होत होता,सदर अतिक्रमण स्वतः काढून घेण्याबाबत संबंधित नागरिकांना पूर्व सूचना देण्यात आली होती, परंतु सदर अतिक्रमण त्यांच्याद्वारे न काढल्यामुळे झोन क्रमांक दोनच्या बांधकाम, स्वच्छता व अतिक्रमण निर्मूलन विभागाद्वारे संयुक्तपणे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात आली. सदर कारवाईमुळे अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ येथील अतिक्रमणांवर देखील लवकरच कारवाई केली जाणार असून शहराच्या इतर भागातील अतिक्रमणेही मोकळी करून मुख्य रस्ते तसेच फूटपाथ खुले केले जाणार असल्याचे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा अतिक्रमण विभागाचे उपअभियंता अविनाश रघटाटे यांनी सांगितले. कारवाईदरम्यान रघटाटे यांच्यासह शाखा अभियंता दिनेश हंबर्डे व लक्ष्मण पावडे, अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख योगेश कोल्हे, स्वास्थ निरीक्षक कलोसे, निरीक्षक अन्सार अहमद व संदीप सोनवणे तसेच गाडगे नगरचे पोलीस पथक यांनी सहभाग नोंदविला. ^शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे.काही जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान जोपर्यंत शहरातील रस्ते व फूटपाथ मोकळे होणार नाहीत, तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील. त्यामुळे ज्यांनी अतिक्रमण केले असेल त्या सर्वांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा महानगरपालिका प्रशासन काढून घेईल. पुढे त्यांना कारवाईलाही सामोरे जावे लागेल. – योगेश कोल्हे, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख, मनपा.
Source link
अतिक्रमणांवर हातोडा, रस्त्यांचा श्वास मोकळा:पालिकेची मोहीम, कारवाईपासून वाचण्यासाठी महानगरपालिकेने दिला अल्टिमेटम