Headlines

सावता महाराजांच्या भेटीसाठी ‘विठ्ठला’चे अरणगावला प्रस्थान:विठ्ठल-रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज मंदिरात अभंग गायन‎




संत सावता महाराजांचा प्रसिद्ध अभंग “कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाबाई माझी’ या चा जयघोष करून आणि टाळ-मृदंगाच्या तालावर पांडुरंगाच्या पालखीचे संत सावता माळी यांच्या समाधी सोहळ्यासाठी अरण (ता. माढा) कडे अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. पंढरपूर येथील काशी कापडी मठातून निघालेला हा सोहळा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात अभंग गाऊन अरणच्या दिशेने पुढे मार्गस्थ झाला. आषाढी वारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सर्व संतांच्या पालख्या पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला येतात. मात्र, ‘कामातच देव’ मानणारे थोर संत सावता माळी यांची पालखी कधीही पंढरपूरला आली नाही. संतांच्या या भावनेचा आदर करत पंढरपूरमधून ‘काशी कापडी समाज’ गेल्या अनेक वर्षांपासून पांडुरंगाच्या पादुका स्वतः अरण येथे घेऊन जाण्याची अनोखी परंपरा जपत आहे. या सोहळ्यात संत सावता माळी यांचे वंशज प्रभू महाराज वसेकर यांच्यासह राज्यभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. संत सावता महाराजांची ७३१ वी पुण्यतिथी श्रीक्षेत्र अरण (ता. माढा) येथे साजरा होत आहे. ६ ऑगस्टपासून हरिनाम सप्ताहाने सुरुवात झाली. पंढरपूरहून ता. ८ रोजी पालखी प्रस्थान. पहिला मुक्काम रोपळे, ता. ९ रोजी आष्टी, ता. १० रोजी सायंकाळी ६ वाजता पालखी अरणला येईल. रात्री ८ वाजता स्वागत करून गावातून मिरवणूक काढण्यात येईल. मंगळवार, ता. ११ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत संत सावता महाराजांच्या समाधीवर फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम. बुधवारी श्रीफळ हंडी सोहळा, गुरुवारी विठ्ठल पालखी व संत सावता महाराज पालखी यांची गावप्रदक्षिणा,शुक्रवार पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, सांगता सोहळा होणार आहे. या सोहळ्यात आमदार अभिजित पाटील यांनीही हजेरी लावली. “जय हरी विठ्ठल”चा गजर करत ते वारकऱ्यांसोबत पांडुरंगाच्या पालखी सोबत रोपळे गावापर्यंत पायी चालत भाविकांमध्ये पूर्णपणे तल्लीन झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *