Headlines

मोहोळला बायपासची प्रतीक्षा कायम महा-वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त




मोहोळ ते वळसंग या प्रस्तावित ८१ किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे मोहोळ शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. सदर महामार्ग शहरातूनच जाणार असल्याची चर्चा सुरू असून, आधीच वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या शहरावर भविष्यात वाहनांचा अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे प्रस्तावित महामार्ग शहरातून न नेता मोहोळ शहराला स्वतंत्र बायपास देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुंबई, पुणे तसेच सांगली, सातारा आदी भागांतून येणाऱ्या एसटी बससह शहरातील वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी आणि उतरण्यासाठी पुरेशा रॅम्पची सुविधा उपलब्ध नसल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच मोहोळ-वळसंग महामार्गाची वाहतूक शहरातून वाढल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. मोहोळ तालुक्यातील सुमारे २० गावांमधील एकूण ९९.२४ हेक्टर जमीन संपादित करून मोहोळ ते वळसंग ८१ किलोमीटरचा महामार्ग उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या महामार्गाचा मार्ग शहरातून गेल्यास भविष्यातील वाहतुकीचा विचार करता मोहोळकरांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.सध्या मोहोळ शहरातून दररोज शेकडो ट्रक, कंटेनर, एसटी बस, खासगी प्रवासी वाहने तसेच अन्य अवजड वाहने ये-जा करतात. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, शासकीय कार्यालये आणि रुग्णालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शहरांना राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बायपास रस्त्यांची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या शहरांमधील वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच शहरातील बाजारपेठांनाही चालना मिळाली असून, विविध व्यवसायांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. असे असताना मोहोळसारख्या महत्त्वाच्या शहराला अद्याप बायपास रस्ता का मिळालेला नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहराची वाढती लोकसंख्या, भविष्यातील वाहतुकीची गरज आणि शहराचा सर्वांगीण विकास लक्षात घेता मोहोळला बायपास देणे ही आता काळाची गरज बनली आहे. प्रस्तावित मोहोळ-वळसंग महामार्गाची वाहतूक शहरातून नेल्यास भविष्यात वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांच्या गैरसोयीमध्ये मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मोहोळ शहरासाठी स्वतंत्र बायपासचा प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करावा आणि प्रस्तावित महामार्गाचा मार्ग शहराबाहेरून नेण्यात यावा, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे.वळसंग ते तांदुळवाडी या २४ किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक भूसंपादनाचा आराखडा अंतिम टप्प्यात असून, लवकरच तो महामार्ग विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर या टप्प्याचेही काम हाती घेतले जाईल. या टप्प्यात वळसंग, दिंडूर, धोत्री, मुस्ती आणि तांदुळवाडी येथील जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. मोहोळसारख्या शहराला आजही बायपास नाही ^सोलापूर जिल्ह्यातील अनेक शहरांना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बायपास रस्ते उभारण्यात आले आहेत. मात्र, मोहोळसारख्या महत्त्वाच्या शहराला आजही बायपास नाही. त्यामुळे अवजड वाहतूक शहरातूनच जात असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघाताच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. प्रस्तावित वळण मार्गही शहरातून नेण्याऐवजी शहराबाहेर बायपासद्वारे नेण्यात यावा. – सौरभ देशमुख, नागरिक, मोहोळ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *