Headlines

कास तलावाला ‘भुशी डॅम’चे स्वरूप:पर्यटकांच्या हुल्लडबाजीने पोलीस आणि स्थानिक हैराण; VIDEO




​जागतिक वारसा स्थळ असलेल्या प्रसिद्ध कास पुष्पपठाराचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच, कास तलाव आणि परिसरात पर्यटकांचा ओघ प्रचंड वाढला आहे. कास तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागल्याने या ठिकाणाला लोणावळ्याच्या ‘भुशी डॅम’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. निसर्गाचा हा मनमोहक नजराणा अनुभवण्यासाठी शनिवार आणि सुट्टीच्या दिवशी राज्यभरातून पर्यटकांची तुफान गर्दी उसळत आहे. मात्र, पर्यटकांची हुल्लडबाजी, नियमभंग आणि भीषण वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक अन् वाहनचालकांचे हाल बेहाल होत आहेत. ​सुरक्षेचे नियम धाब्यावर ​सांडव्यावरून वेगाने वाहणाऱ्या पाण्यात भिजण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही. मात्र, हा प्रवाह अत्यंत धोकादायक असल्याने प्रशासनाने येथे जाण्यास बंदी घातली आहे. तरीही काही अतिउत्साही पर्यटकांनी सुरक्षेसाठी लावलेले लोखंडी गेट तोडून पाण्यात उतरण्याचा प्रयत्न केला. पर्यटकांना रोखताना तैनात पोलिसांची मोठी दमछाक झाली, तर काही ठिकाणी पर्यटक आणि पोलिसांमध्ये तीव्र बाचाबाचीही झाली. निसर्गाचा आनंद लुटण्याऐवजी वाढत्या हुल्लडबाजीमुळे पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. ​किलोमीटर लांब रांगा ​वाढत्या गर्दीसोबतच कास-बामणोली मार्गावर अस्ताव्यस्त पार्किंगमुळे भीषण वाहतूक कोंडी होत आहे. पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने पर्यटकांनी वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी केल्याने कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तासन् तास गाड्या खोळंबल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला, तर स्थानिक नागरिक पुरते हैराण झाले. ही समस्या दर शनिवार-रविवारी निर्माण होत असल्याने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता पोलीस, वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने एकत्र येऊन पार्किंग व वाहतुकीचे ठोस आणि कायमस्वरूपी नियोजन करावे, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *