Headlines

वन्यजीवांच्या त्रासाला कंटाळून 12 एकर तुरीवर फिरवला ट्रॅक्टर:नीलगाय-हरणांच्या कळपाने उभे पीक केले उद्ध्वस्त‎




वन्यजीवांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वनोजा बाग येथील शेतकरी चंदन गायगोले यांच्या १२ एकर शेतातील उभ्या तुरीच्या पिकावर नीलगाय व हरणांच्या कळपाने धुडगूस घातला. पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने अखेर उभ्या तुरीच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीक मोडून टाकले. चंदन गायगोले यांनी मोठ्या अपेक्षेने १२ एकर क्षेत्रात तुरीची पेरणी केली होती. बियाणे, खते, मशागत, नांगरणी, वखरणी आणि पेरणीसाठी मोठा खर्च झाला. मात्र, वन्यप्राण्यांनी शेतात घुसून तुरीचे पीक फस्त केल्याने संपूर्ण मेहनत आणि खर्च वाया गेला. पिकाची झालेली अवस्था पाहून दुबार पेरणी करायची तरी त्यासाठी पैसा कुठून आणायचा, असा प्रश्न शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे. वनोजा बाग परिसरात गेल्या काही दिवसांपासून नीलगाय व हरणांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवस-रात्र वन्यप्राणी शेतात घुसून सोयाबीन, तूर आणि इतर पिकांची नासाडी करीत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. तातडीने पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी या घटनेची वन विभाग व महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी, १२ एकर तुरीच्या पिकाचा पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून होत आहे. तसेच वन्यप्राण्यांचा शेतातील वाढता वावर रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी जोर धरत आहे.वनोजा बाग परिसरात गेल्या काही दिवसांपासून नीलगाय व हरणांचा वावर वाढला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *