![]()
“ज्यांच्या पितृ संघटनेने (RSS) कधीही स्वतःच्या मुख्यालयावर तिरंगा फडकवला नाही, ज्या पक्षाने स्वातंत्र्यलढ्यात कधीही भाग घेतला नाही आणि ज्यांचे देशासाठी कोणतेही बलिदान नाही, अशांना जर आता तिरंग्याचा पुळका येत असेल, तर त्यांचे स्वागतच आहे. उशिरा का होईना, त्यांना शहाणपण सुचले आहे,” अशी खरमरीत टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) केली आहे. काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी मुंबईत आलेल्या सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपच्या ‘तिरंगा यात्रे’वर, तसेच राज्यातील आणि देशातील विविध राजकीय मुद्द्यांवर रोखठोक मते मांडली. तिरंगा यात्रा काढताय, पण यात कावा नसावा राज्यात भाजप आणि महायुतीकडून काढण्यात येत असलेल्या ‘तिरंगा यात्रा’ आणि मुख्यमंत्र्यांच्या सहभागावर बोलताना सपकाळ यांनी भाजपच्या इतिहासावर बोट ठेवले. ते म्हणाले, “देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे काहीही योगदान नाही, ते आता तिरंगा यात्रा काढत आहेत. उशिरा का होईना, ‘देर आये दुरुस्त आये’ या न्यायाने हे चांगलेच आहे. पण यामागे केवळ राजकीय स्वार्थ आणि कावा नसावा, अशी आमची अपेक्षा आहे.” शरद पवार गटाच्या खासदारांची मोदी भेट स्वाभाविक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट आणि ‘डीलिमिटेशन’ बिलाबाबतच्या चर्चेवर ते म्हणाले, “पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात. ते विशिष्ट लोकांना भेटतात आणि काहींना भेटत नाहीत, त्यामुळे प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेण्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. आगामी काळात ‘डीलिमिटेशन’ (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक जर संविधानाच्या विरोधात असेल आणि त्यामुळे प्रातिनिधिक समतोल बिघडणार असेल, तर त्याला सर्व देशवासीयांनी आणि राजकीय पक्षांनी विरोध केला पाहिजे.” दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर विश्वास न ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पृथ्वीराज चव्हाण यांनी पारदर्शक कारभार केला 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच सत्ता गेली, या उद्धव ठाकरे गटाच्या आरोपावर उत्तर देताना सपकाळ यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची पाठराखण केली. ते म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे आणि चांगल्या पद्धतीने हाताळला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य काँग्रेस पक्षाला दिले असून, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे काम अत्यंत वाखाणण्याजोगे राहिले आहे.” काँग्रेसची रणनीती: रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आगामी काळातील काँग्रेसच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले, “राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) जाती-पाती, धर्म आणि पंथाच्या नावावर समाजात फूट पाडून राजकारण करत आहे. त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. याविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक भूमिकेतून तीव्र संघर्ष करेल.” जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न मिटवा राज्यात सुरू असलेल्या मराठा-ओबीसी वादावर आणि उपवर्गीकरणावर ते म्हणाले, “समाजात फूट पाडा आणि राज्य करा (तोडा आणि फोडा), ही भाजपची जुनी रणनीती आणि नीती आहे. देशात जनगणना सुरूच असते, त्यात केवळ एका रकान्याची वाढ करून तातडीने ‘जातनिहाय जनगणना’ करावी आणि देशातील आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे.” भाजपच्या खासदारांचे आंदोलन हास्यास्पद झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनावरून दिल्लीत संसदेबाहेर भाजप खासदारांनी केलेल्या आंदोलनावर सपकाळ यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीहल्ला झाला, बंदुका चालवल्या गेल्या, तेव्हा यातील कोणीही एक चकार शब्द बोलले नाही. आणि आता झारखंडचा मुद्दा पुढे करून हे लोक संसदेबाहेर आंदोलन करत आहेत, हे अतिशय हास्यास्पद आहे. झारखंडमधील चुकीच्या गोष्टींचा राहुल गांधींनी यापूर्वीच निषेध केला आहे.” हेही वाचा… सरकार मनोज जरांगेंना का घाबरतेय?:एक दिवस उपोषणाला बसले की मंत्री धावतात; म्हणूनच हिंमत वाढली, ओबीसी नेत्यांना टार्गेट करू नका- विजय वडेट्टीवार “मनोज जरांगे यांना राज्य सरकार नक्की का घाबरत आहे? ते उपोषणाला बसले की सरकारचे मंत्री त्यांच्यापुढे पायघड्या घालतात, त्यामुळेच त्यांची हिंमत वाढली आहे, असे म्हणत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
तिरंगा यात्रेवरून हर्षवर्धन सपकाळांचे भाजपवर टीकास्त्र:म्हणाले- देशासाठी कोणतेही बलिदान न देणाऱ्यांना तिरंग्याचा पुळका येतोय, ही चांगली गोष्ट!