Headlines

गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण:अनुदान लाटणाऱ्या संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई करणार; आशिष जयस्वाल यांचा कडक इशारा




गडचिरोली येथील एका खासगी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. या घटनेची पाहणी केल्यानंतर हा केवळ अपघात नसून संस्थाचालक आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित संस्थाचालक, गायब असलेले मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती आशिष जयस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर जयस्वाल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पीडित कुटुंबांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी आश्रमशाळांच्या विदारक स्थितीवर आणि गलथान कारभारावर सविस्तर माहिती दिली. लाकडांचा साठा आणि सापाचा प्रवेश मुली तळमजल्यावर झोपल्या होत्या. त्या खोलीच्या खिडकीजवळ आणि भिंतीला लागून किमान चार-पाच ट्रक जळाऊ लाकडांचा आणि विटांचा मोठा ढिगारा रचून ठेवला होता. या विटांच्या आणि लाकडांच्या आधाराने खिडकीतून ‘इंडियन क्रेट’ (मन्यार) जातीच्या सापाने आत प्रवेश केला. वनक्षेत्रात तळमजल्यावर मुलांना झोपवणे आणि खिडक्यांना जाळ्या नसणे हा मोठा निष्काळजीपणा होता. ‘मन्यार’ सापाचा दंश आणि मृत्यूचे कारण मन्यार सापाने दंश केल्यास केवळ मुंगी चावल्यासारखी वेदना होते. सापाने लागोपाठ पाच मुलींना दंश केला, मात्र, सुरुवातीला कुणालाच काही समजले नाही. एका मुलीला वारंवार दंश झाल्यावर ती झोपेतून उठून ओरडली, तेव्हा हा भयंकर प्रकार उघडकीस आला. या घटनेत तीन मुलींचा मृत्यू झाला, तर दीपिका मडावी हिला एअरलिफ्ट करून नागपूरला हलवण्यात आले आहे. आणखी एका मुलीवर गडचिरोलीत उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. आश्रमशाळा काँग्रेस नेत्याची; केवळ अनुदान लाटण्याचा आरोप ही आश्रमशाळा गेल्या 27-28 वर्षांपासून सुरू असून ती काँग्रेसचे माजी आमदार, खासदार आणि मंत्री मारोतराव कोवासे यांच्या मालकीची असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. कोट्यवधी रुपयांचे अनुदान घेऊनही मुलींना झोपायला साधे बेड नव्हते, त्या सतरंजीवर झोपल्या होत्या. केवळ अनुदान लाटण्यासाठी संस्था चालवली जात असून विद्यार्थ्यांना योग्य जेवण आणि सोयीसुविधा दिल्या जात नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. मुख्याध्यापक आणि अधीक्षक गायब घटनेच्या रात्री आश्रमशाळेत अधीक्षक उपस्थित नव्हत्या आणि मुख्याध्यापकही गायब होते. नियमानुसार ९० टक्के शिक्षकांनी मुख्यालयात किंवा आश्रमशाळेत राहणे अनिवार्य असताना, शिक्षक तिथे राहत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे आणि 14 तारखेला नवी नियमावली या गलथान कारभाराबद्दल संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर तातडीने फौजदारी कारवाई (FIR) करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. 14 तारखेला आदिवासी विकास मंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून, सर्व आश्रमशाळांसाठी नवीन कडक नियमावली आणि कार्यपद्धती जाहीर केली जाईल. पवित्र पोर्टलद्वारे होणार भरती भरती प्रक्रियेतील घोटाळे रोखण्यासाठी आता खासगी आश्रमशाळांमधील शिक्षक भरतीदेखील ‘पवित्र पोर्टल’च्या माध्यमातून केली जाणार आहे. तसेच, शिक्षकांना 80 किलोमीटरच्या अंतराचा निकषही लागू करण्यात आला आहे. “कल्याणकारी राज्यात संस्थाचालकांचे लाड पुरवण्यासाठी सरकार नाही, तर गरीब विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आश्रमशाळांमधील ही दुर्दशा यापुढे अजिबात खपवून घेतली जाणार नाही,” असा कडक इशारा आशिष जयस्वाल यांनी शेवटी दिला. हेही वाचा… 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूवरून राजकारण तापलं:भाजपचा पलटवार- आश्रमशाळेतील मृत्यू दुर्दैवी, पण संजय राऊत राजकीय पोळी भाजतात; ती संस्था काँग्रेस नेत्याचीच! गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा झालेला मृत्यू अतिशय दुर्दैवी असून राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेवर संजय राऊत केवळ राजकारण करत आहेत आणि राजकीय पोळी भाजत आहेत. राऊतांनी सरकारला प्रश्न विचारण्यापूर्वी ही आश्रमशाळा नक्की कुणाची आहे, याची माहिती घ्यायला हवी होती. ती आश्रमशाळा काँग्रेसचे माजी खासदार मारोतराव कोवासे यांचीच आहे, असा खळबळजनक खुलासा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि महाविकास आघाडीवर (MVA) सडकून टीका केली. येथे वाचा संपूर्ण बातमी मंत्र्यांच्या घरात साप-विंचू सोडा, मग मृत्यूचं भय कळेल!:गडचिरोलीतील मृत्यूंवरून संजय राऊतांचा संताप, म्हणाले- अमित शहांना तरुणांच्या रोषाला सामोरे जावेच लागेल गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत धक्कादायक घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आदिवासींची मुले सर्पदंशाने आणि विंचू चावल्याने मरत आहेत, तर दुसरीकडे हजारो आदिवासी खनिज कंपन्यांच्या गाड्यांखाली चिरडून मरत आहेत. हे सरकार केवळ आदिवासींच्या जीवावर उठले आहे,” अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *