Headlines

सोलापुरात खळबळ:तुझ्या आमदारास गोळी घाल, पैसे देतो; ड्रायव्हरलाच ऑफर, दोघांवर गुन्हा दाखल




“तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार.. तुला पैसे देतो, पुढचे मी बघून घेतो,’ अशी ऑफर दोन आरोपींनी अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या कारचालकाला दिली. सोलापूरमधील एका शोरूमबाहेर ७ ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकाराची स्वत: चालकानेच सदर बझार पोलिसात फिर्याद दिली त्यावरून सोमवारी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चालकाने सांगितलेले आरोपी सीसीटीव्हीत त्याला भेटल्याची खात्री केल्यानंतर पोलिसांनी तडीपार गुंड श्रीशैल हुळ्ळे आणि त्याचा चालक प्रभाकर फुलारी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. फुलारी यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून हुळ्ळेचा पोलिस शोध घेत आहेत. आनंद स्वामीराव सुरवसे (३०, रा. मोटयाळ, ता. अक्कलकोट) हे गेल्या १५ दिवसांपासून आमदार कल्याणशेट्टी यांच्याकडे वाहन चालक म्हणून कामाला लागले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘मी ७ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेचार वाजता आमदारांच्या पत्नी आणि मुलाला घेऊन सोलापूरच्या महावीर चौकातील प्युमा शोरूमजवळ कारमधून आलो होतो. आमदारांचे कुटुंबीय शोरूममध्ये गेल्यानंतर मी बाहेरच थांबलो होतो. त्या वेळी पांढरा शर्ट घातलेल्या श्रीशैल हुळ्ळे आणि त्याच्यासोबतच्या फुलारी हे दोघे माझ्याजवळ आले. “तुला पैसे देतो, तुझ्या दादा आमदाराला गोळी घालून मार, पुढचे मी बघून घेतो,’ अशी चिथावणी त्यांनी दिली.’ या प्रकारामुळे घाबरलेल्या चालकाने ही बाब आमदारांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांना सांगितली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयितांची ओळख पटली. आरोपी हुळ्ळे धाराशिव अन् सोलापुरातून तडीपार आमदारांच्या हत्येची सुपारी देण्याचा प्रयत्न करणारा मुख्य संशयित आरोपी श्रीशैल हुळ्ळे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर वळसंग पोलिस ठाण्यात सहा गुन्हे आहेत. त्यामध्ये वाळू चोरी, मारहाण व धमकावणे,पोक्सो सारखे गुन्हे आहेत. त्याला गेल्या वर्षी ग्रामीण पोलिसांनी धाराशिव आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांतून तडीपार (हद्दपार) केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *