Headlines

गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण:मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमची बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश




गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर अखेर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक-अधीक्षिका अशा तिघांवर धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. अहवालानंतर मोठी कारवाई: तिघांवर गुन्हा दाखल 10 ऑगस्ट रोजी पहाटे झोपेत असताना सापाने दंश केल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आश्रमशाळेतील भीषण अवस्था आणि प्रशासनाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला. या घटनेची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात आश्रमशाळा प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला. घटनेच्या वेळी मुख्याध्यापक आणि शिक्षक शाळेत उपस्थित नव्हते. सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभू सादमवार यांच्या फिर्यादीवरून 12 ऑगस्ट रोजी पहाटे धानोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली. मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार, अधीक्षक भास्कर भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह ‘बाल न्याय अधिनियमांतर्गत’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमके काय आहे प्रकरण? धानोरा येथील जपतलाई आश्रमशाळेत विद्यार्थिनी रात्री जेवण करून जमिनीवर झोपलेल्या होत्या. रात्री दोन ते अडीच वाजताच्या सुमारास त्यांना सापाने दंश केला. उपचारादरम्यान दीपिका लकडा (इयत्ता 6वी), सुष्मिता मंडल (इयत्ता 8वी) आणि अनु कोरेटी (इयत्ता 2री) या तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला. दंश झालेल्यांपैकी दीपिका मडावी, कविता किरंगा आणि समृद्धी नैताम या तीन मुलींवर उपचार सुरू आहेत. यापैकी एका अत्यवस्थ विद्यार्थिनीला विशेष हेलिकॉप्टरने नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले होते. तातडीने विष प्रतिबंधक औषधे दिल्याने तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असून, लवकरच तिला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे. सरकारचे कठोर पाऊल; आश्रमशाळा कायमची बंद करण्याचे आदेश संबंधित आश्रमशाळा ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या मालकीची आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. आदिवासी समाजातील मंत्र्यांनी यावर संताप व्यक्त केला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले की, ज्या शाळेत शिक्षक, वॉर्ड आणि सुविधा नाहीत, अशा जपतलाई आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करा. शासकीय अनुदान घेऊनही सुविधा दिल्या जात नसताना, ज्या अधिकाऱ्याने या शाळेची तपासणी करून ‘ओके’ अहवाल दिला, त्याला तातडीने निलंबित करा. मुख्य सचिवांनी एक बैठक घेऊन सर्व विभागांना सामाविष्ट करत राज्यातील सर्व आश्रमशाळांच्या तपासणीची नवीन यंत्रणा उभी करावी. फक्त रस्त्यावरच्या नव्हे, तर दुर्गम भागातील आश्रमशाळांचीही तपासणी करावी. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी स्पष्ट केले की, “ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा मुख्याध्यापक आणि शिक्षक तिथे नव्हते. फक्त दोन कर्मचारी उपस्थित होते. राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची आता त्रयस्थ संस्थेकडून चौकशी केली जाईल. मूल्यांकनात ज्या शाळांमध्ये सुविधा नसतील, त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जाईल.” या कठोर कारवाईमुळे आता राज्यातील आश्रमशाळांच्या कारभारात सुधारणा होईल का आणि संस्थाचालक मारोतराव कोवासे यांच्यावर थेट कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण:अनुदान लाटणाऱ्या संस्थाचालकांवर फौजदारी कारवाई करणार; आशिष जयस्वाल यांचा कडक इशारा गडचिरोली येथील एका खासगी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. या घटनेची पाहणी केल्यानंतर हा केवळ अपघात नसून संस्थाचालक आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित संस्थाचालक, गायब असलेले मुख्याध्यापक आणि अधीक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती आशिष जयस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर जयस्वाल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पीडित कुटुंबांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी आश्रमशाळांच्या विदारक स्थितीवर आणि गलथान कारभारावर सविस्तर माहिती दिली. इथे सविस्तर बातमी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *