![]()
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शन सुधारणेसाठी कंपनीच्या नफा-तोट्यावर आधारित ‘परवडणारी क्षमता अट’ रद्द करण्याची मागणी बीएसएनएल कर्मचारी व पेन्शनर्स संघटनांनी केली आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. ही अट अन्यायकारक असून ती तातडीने शिथिल किंवा रद्द करावी, असे संघटनांनी म्हटले आहे. संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएलची स्थापना १ ऑक्टोबर २००० रोजी झाली. सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दूरसंचार सेवा पुरवणे आणि दुर्गम भागांत संपर्क व्यवस्था उपलब्ध करून देणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश होता. नैसर्गिक आपत्ती आणि राष्ट्रीय संकटांच्या काळातही बीएसएनएलने आर्थिक नफ्याचा विचार न करता प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांना महत्त्वपूर्ण सेवा दिल्या आहेत. ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या उपक्रमांमध्ये बीएसएनएल देशाच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सरकारने बीएसएनएलला दोन वेळा पुनरुज्जीवन पॅकेज दिले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून बीएसएनएल नफ्यात येत असल्याचे केंद्र सरकार, पंतप्रधान आणि केंद्रीय दूरसंचार मंत्र्यांनी जाहीर केले आहे. असे असतानाही कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शन सुधारणेसाठी ‘परवडणारी क्षमता अट’ कायम का ठेवण्यात आली आहे, असा सवाल संघटनांनी उपस्थित केला. कोल इंडिया, भारतीय पोलाद प्राधिकरण (SAIL) आणि दिल्ली मेट्रो यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील इतर संस्थांना या अटीतून शिथिलता मिळत असताना, बीएसएनएलला ती का दिली जात नाही, असा प्रश्नही संघटनांनी विचारला. बीएसएनएलच्या संचालक मंडळाने २० मार्च २०१८ रोजीच सार्वजनिक उद्योग विभागाकडे (DPE) ही अट शिथिल किंवा रद्द करण्याची शिफारस केली होती. मात्र, त्यानंतरही या निर्णयाला विलंब होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या पत्रकार परिषदेला बीएसएनएल कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र परिमंडळ अध्यक्ष नागेश नलावडे, अखिल भारतीय बीएसएनएल निवृत्त कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र परिमंडळ सचिव युसुफ जकाती यांच्यासह विकास कदम, वृषाली दाभोळकर, गणेश भोज, किशोर गवळी, रोहिणी कुलकर्णी आणि दिलीप मगर आदी उपस्थित होते. पात्र कर्मचारी, अधिकारी आणि पेन्शनधारकांना न्याय्य वेतन व पेन्शन सुधारणा तातडीने लागू कराव्यात, अशी मागणी यावेळी पुन्हा करण्यात आली.
Source link
परवडणारी क्षमता अट रद्द करा:बीएसएनएल कर्मचाऱ्यांची वेतन-पेन्शन सुधारणेची मागणी