Headlines

कुंभमेळा:591कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर देणारा मंत्री महाजनांचा नातेवाईक, ठेकेदारांकडून 3 कोटी उकळणाऱ्या तिघांना जामनेर येथून अटक




आगामी कुंभमेळ्यात कामांसाठी ठेकेदारांना ५९१ कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर देत ३ कोटी ५० हजार रुपये उकळणारा मंत्री गिरीश महाजन यांचाच दूरचा पुतण्या असल्याचे उघड झाले. मंगळवारी या प्रकरणात महाजनांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर येथून तनय अनंत महाजन, नरेंद्र तोताराम महाजन, शकील अहमद सलीमउद्दीन शेख (मूळ रा. धुळे) यांना अटक करण्यात आली. त्यानंतर बुधवारी मंत्री महाजनांनीच जामनेर येथे माध्यमांना सांगितले की, या घोटाळ्यात माझा नातेवाईक असला तरी कोणालाही सोडणार नाही. या प्रकरणात आणखी मोठे चेहरे असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, बनावट वर्क ऑर्डरचा विषय कानावर येताच मी स्वत: मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. त्याचबरोबर पोलिस आयुक्तांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. यातील तनय हा माझा दूरचा नातेवाईक आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका ठेकेदाराने काम मिळवण्यासाठी या ठगांना तब्बल २५ लाख रुपये दिले आहेत. तनय महाजन, नरेंद्र महाजनने असा रचला ५९१ कोटींच्या कंत्राटाचा बनाव 1. पाच बनावट टेंडर्स : आरोपी तनय, नरेंद्र महाजन, शकीलने नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे खोटे दस्तऐवज तयार केले.
2. कामांचे स्वरूप : हाउसकीपिंग, पोलिसांना आहार, स्नानासाठीचे साहित्य पुरवणे अशा ५ कामांचा ५९१ कोटींच्या निविदांचा समावेश होता.
3. ठेकेदारांचा विश्वास बसावा म्हणून विभागीय आयुक्तांची बनावट डिजिटल सही व भारत सरकारची राजमुद्रा असलेल्या वर्क ऑर्डर दिल्या. कुंभमेळ्याआधीच सुमारे १५० कार्यकर्त्यांचा नाशकात मुक्काम
पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात निघणारी कोट्यवधींची कामे मिळवण्यासाठी जामनेरसह जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, धुळे येथील १५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी नाशिक शहरात मुक्काम ठोकला आहे. शासकीय कार्यालये, शासकीय विश्रामगृह, मुंबईतील मंत्रालय येथे या कार्यकर्त्यांच्या झुंडी फिरत असल्याची माहिती कार्यकर्त्यांच्या गोटातून पुढे आली. दोघांच्या कुटुंबीयांशी माझा संबंध नाही
माझे आरोपींच्या कुटुंबाशी कौटुंबिक संबंध नाहीत. दोघांच्या दारूच्या व्यसनाने त्यांच्या कुटुंबीयांना शेतजमीन विकावी लागलेली आहे. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश मी दिले आहेत. -गिरीश महाजन, कुंभमेळा मंत्री ठेकेदार भूलथापांना बळी
आता सर्व प्रक्रिया ऑनलाइन होते. कुठलेही टेंडर असे पैसे देऊन मिळत नाही. कुठलीही पडताळणी न करता लाखो रुपये दिले. मोठे ठेकेदार असूनही अशा भूलथापांना बळी पडले ही ठेकेदारांची चूकच म्हणावी लागेल असेही मत मंत्री महाजन यांनी नोंदवले. एकाकडून २ कोटी १७ लाख रुपये उकळले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तनय, नरेंद्र, शकीलने एका ठेकेदाराला हाउसकीपिंगचे काम मंजूर करून देण्याचे खोटे आश्वासन देऊन त्याच्याकडून तब्बल २ कोटी १७ लाख ५० हजार रुपये उकळले. कार्यकर्ते बनून ठगांनी बेरोजगारांनाही लुटले
तनय महाजनसह काहींनी जामनेर तालुक्यातील तरुणांना ग्रामसेवक, तलाठी करतो अशा भूलथापा देऊन लाखो रुपयांची फसवणूक केली, अशा तक्रारी आल्यानंतर मंत्री महाजन यांनी पोलिसांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक येथे ३ स्वतंत्र गुन्हे दाखल कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट डिजिटल सही, भारत सरकारची राजमुद्रा वापरून लूट करणाऱ्यांविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात ३ स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *