Headlines

शून्य आयकर विवरणपत्र भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नाही:भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्याकडे शेतकऱ्यांची कैफियत‎




कर्जावर दुचाकी घेण्यासाठी सामान्य शेतकरी कर्जदार बँकेकडे शून्य आयकर विवरणपत्र सादर करतो. अशा शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीतून वगळण्यात आले आहे. शेतकऱ्यांवर झालेला अन्याय शासनाने त्वरित दूर करून कर्जमाफी योजनेत सामील करून घ्यावे, अशी विनंती शेतकऱ्यांनी बुधवारी भाजपचे प्रदेश सरचिटणीस व मराठवाडा संयोजक माजी आमदार सुनील राणे यांच्याकडे केली. राणे यांनी बुधवारी सायंकाळी टोणगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. त्यांच्यासमवेत फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण, आमदार सुहास शिरसाठ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष रामूकाका शेळके, बाजार समितीचे सभापती श्रीराम शेळके आदी उपस्थित होते. बोरदहेगाव | महालगाव परिसरात भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांनी बुधवारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. राणे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न शासन व अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. कर्जमाफी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. टोणगाव, जडगावच्या शेतकऱ्यांच्या मागण्या : या वेळी रामभाऊ आहेर (टोणगाव), ज्ञानेश्वर भोसले व रामकिसन भोसले (जडगाव) आदी उपस्थित शेतकऱ्यांनी राणे व आमदारांसमोर आपल्या मागण्या व गाऱ्हाणी विस्तृतपणे मांडली. प्रारंभी राणे यांनी शासनाची भूमिका शेतकऱ्यासमोर विशद केली. कर्जमाफीतील त्रृटी, तक्रारी, प्रश्न ऐकल्यानंतर तुमची सर्व कारणे मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतो, असे या वेळी राणे यांनी शेतकऱ्यांसमोर सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *