आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी 591 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांकडून 3 कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक (पुतण्या) तनय महा
.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची टीका
वर्षा गायकवाड यांनी ‘X’ (ट्विटर) वर ट्विट करत सरकारला धारेवर धरले. त्यांनी विचारले की, “कुंभमेळा हा श्रद्धेचा उत्सव आहे की सत्ताधाऱ्यांच्या कमाईचा मेळा?”
“भाविकांच्या श्रद्धेच्या नावावर 591 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर्सचे वृत्त अत्यंत गंभीर आहे. सरकारी तिजोरी लुटण्याचा हा कोणता विकास? कागदावर कामे, बनावट कागदपत्रे आणि सरकारी यंत्रणेला अंधारात ठेवून काढलेल्या वर्क ऑर्डर्स हा केवळ भ्रष्टाचार नाही, तर तो भाविकांच्या श्रद्धेवर आणि जनतेच्या पैशांवर टाकलेला दरोडा आहे.”
प्रशासनावर सवाल
“मंत्री महोदयांनी नातेवाईकापासून हात झटकले आहेत. पण या ऑर्डर्स निघेपर्यंत सरकार आणि प्रशासन काय करत होते? जर कुंपणच शेत खात असेल, तर कारवाई कशी होणार? या 591 कोटींच्या गैरव्यवहाराचा एक-एक रुपया कुणाच्या खिशात गेला आणि कोणाच्या आशीर्वादाने हे घडले, याचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. कुंभमेळा श्रद्धेचा आहे, सत्ताधाऱ्यांच्या नातेवाईकांच्या तिजोरी भरण्यासाठी नाही,” असा घणाघात गायकवाड यांनी केला.
विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले. “कुंभमेळा श्रद्धेचा मेळा की भ्रष्टाचाराचा मेळावा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “शेकडो कोटींच्या वर्क ऑर्डर्स निघत असताना प्रशासन झोपले होते का? बनावट टेंडरच्या माध्यमातून एवढा मोठा गैरव्यवहार होत असताना जबाबदार अधिकारी कोण?”
उच्चस्तरीय चौकशीची मागणी
“या आरोपींना कोणाचे राजकीय संरक्षण आहे, याची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. राम मंदिराच्या दानपेटीतील चोरीनंतर आता कुंभमेळ्याच्या नावाने भ्रष्टाचार सुरू असेल, तर महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही.”
नेमके प्रकरण काय आहे?
नाशिकमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 591 कोटींच्या 5 बनावट निविदा (Tenders) काढण्यात आल्या होत्या. यात हाउसकीपिंग, पोलिसांना आहार, स्नानासाठी साहित्य पुरवणे अशा कामांचा समावेश होता. याप्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर (जळगाव) मतदारसंघातून तिघांना अटक करण्यात आली आहे. यात तनय अनंत महाजन, नरेंद्र तोताराम महाजन आणि शकील अहमद सलीमउद्दीन शेख यांचा समावेश आहे. ठेकेदारांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे’ खोटे दस्तऐवज, विभागीय आयुक्तांची बनावट डिजिटल सही आणि भारत सरकारची राजमुद्रा वापरून वर्क ऑर्डर्स दिल्या होत्या.
कोट्यवधींची लूट
या ठगांनी एका ठेकेदाराला हाउसकीपिंगचे काम मंजूर करून देण्याचे खोटे आश्वासन देऊन त्याच्याकडून तब्बल 2 कोटी 17 लाख 50 हजार रुपये उकळले. तर, छत्रपती संभाजीनगर येथील एका ठेकेदाराने 25 लाख रुपये दिले आहेत. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात 3 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मंत्री गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण
या प्रकरणातील मुख्य आरोपी तनय महाजन हा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा पुतण्या असल्याचे समोर आले आहे. मात्र, महाजन यांनी या प्रकरणातून हात झटकले आहेत. ते म्हणाले, “या घोटाळ्यात माझा नातेवाईक असला तरी मी कोणालाही सोडणार नाही. हा प्रकार समजताच मी स्वतः मुख्यमंत्र्यांना आणि पोलिस आयुक्तांना कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. या आरोपींच्या कुटुंबाशी माझे कोणतेही कौटुंबिक संबंध नाहीत.”
त्यांनी ठेकेदारांवरही निशाणा साधला, “आता सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे. कुठलीही पडताळणी न करता मोठे ठेकेदार अशा भूलथापांना कसे बळी पडले, ही त्यांचीही मोठी चूक आहे.” या सर्व प्रकारामुळे आता राजकीय वातावरण तापले असून, आगामी काळात या प्रकरणात आणखी कोणकोणते ‘मोठे चेहरे’ समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा…
कुंभमेळा: 591कोटींच्या बनावट वर्क ऑर्डर देणारा मंत्री महाजनांचा नातेवाईक, ठेकेदारांकडून 3 कोटी उकळणाऱ्या तिघांना जामनेर येथून अटक

आगामी कुंभमेळ्यात कामांसाठी ठेकेदारांना ५९१ कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर देत ३ कोटी ५० हजार रुपये उकळणारा मंत्री गिरीश महाजन यांचाच दूरचा पुतण्या असल्याचे उघड झाले. मंगळवारी या प्रकरणात महाजनांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर येथून तनय अनंत महाजन, नरेंद्र तोताराम महाजन, शकील अहमद सलीमउद्दीन शेख (मूळ रा. धुळे) यांना अटक करण्यात आली. येथे वाचा संपूर्ण बातमी