Headlines

तोतया पत्रकाराने लोहमार्ग निरीक्षकाकडे मागितली दहा लाखांची खंडणी:धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न; मुजम्मील शेखवर गुन्हा दाखल




पत्रकार असल्याचे सांगून लोहमार्ग पोलिस निरीक्षकांना धमकावत दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी तोतया पत्रकार मुजम्मील शेख याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख हा ‘टाइम्स ऑफ महाराष्ट्र’चा पत्रकार असल्याचे सांगत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस मुख्यालय, खडकी येथे कार्यरत पोलिस निरीक्षक भगवान विजयरा‌व टोणे (वय 57) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2026 या कालावधीत शेख याने टोणे यांच्याशी मोबाईल आणि व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला. लोहमार्ग पोलिस मुख्यालयात नियमित सुरू असलेल्या ड्रिल सरावाबाबत माहिती मिळवून त्याने टोणे यांना धमकावले. या घटनेची बातमी प्रसिद्ध करून तुमच्यावर कारवाई करीन आणि नोकरी घालवीन, अशी भीती दाखवत त्यांना शिवाजीनगर येथील हॉटेल प्राइडमध्ये बोलावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तेथे शेख याने काही छायाचित्रे दाखवून संबंधित प्रकाराची बातमी प्रसिद्ध करण्याची धमकी दिली. तसेच बातमी टाळण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. टोणे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शेख याने त्यांच्या व्हॉट्सॲपवर त्यांच्याविरुद्ध बातमीची कथित हेडलाईन पाठवली. पैसे न दिल्यास बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केली जाईल, असा दबाव आणल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पैसे न मिळाल्याने शेख याने टोणे यांच्याविरुद्ध खोटी बातमी प्रसिद्ध करून बदनामी केली आणि त्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. जाधव तपास करीत आहेत. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *