Headlines

मुक्ताई ट्रेडिंग फसवणूकप्रकरणी ‎संशयितांची 12 लाख रक्कम फ्रीज‎:आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद‎




बागलाण तालुक्यातील बहुचर्चित ‘मुक्ताई ट्रेडिंग’ फसवणूक प्रकरणात २०० ते ३०० बाधित शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तात्पुरता विराम मिळाला आहे. कांदा व मका उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे २ कोटी ९० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास सुरू आहे. पोलिस तपासात आतापर्यंत संशियातांच्या बँक खात्यांमधील १२ लाख रुपयांची रक्कम फ्रीज करण्यात आली आहे. प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी हरणबारी धरण येथे जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल घेत, अप्पर पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ यांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान तपासाला गती देण्याचे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने प्रस्तावित आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी झालेल्या बैठकीस सुभाष नंदन, अविनाश मानकर, पितांबर नंदन, मित्तल ठाकरे यांसह अन्य शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रकरणात यापूर्वी तीन संशयितांना अटक केली होती. मात्र, त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. दरम्यान, प्रकरणातील संशयित संदेश बागूल आणि उमेश पाटील यांच्याबाबतही तपास यंत्रणेकडून शोध व पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. पोलिस तपासात आतापर्यंत संशियातांच्या बँक खात्यांमधील १२ लाख रुपयांची रक्कम सीझ करण्यात आली आहे. तसेच, संशयित नारायण सुपडू बागुल यांच्या नाशिकमधील सिडको येथील फ्लॅट आणि दत्तात्रेय सुपडू बागुल यांच्या आडगाव येथील फ्लॅटच्या खरेदी-विक्री व गहाणखताच्या व्यवहारांवर प्रशासनाने पूर्ण निर्बंध लादले आहेत. संशयितांच्या नावे असलेल्या इतर स्थावर मालमत्तांची माहिती मिळवण्यासाठी नाशिक जिल्हा निबंधक कार्यालयासह जिल्ह्यातील २१ दुय्यम निबंधक कार्यालयांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मुक्ताई ट्रेडिंगचे मालक नारायण बागुल यांच्या जमिनीवर ‘कृषी उत्पन्न बाजार समिती, नामपूर’ यांच्यामार्फत असलेला बोजा आणि या प्रक्रियेत बाजार समितीचा काही दोष आहे का, या दृष्टीने जायखेडा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. याशिवाय ताहाराबाद परिसरातील एका जमीन व्यवहाराबाबतही संबंधित यंत्रणांकडे चौकशी केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आता केवळ आर्थिक व्यवहारांपुरता मर्यादित न राहता मालमत्ता आणि संस्थात्मक व्यवहारांपर्यंत पोहोचला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *