Headlines

चाकण एमआयडीसी समस्या प्राधान्याने सोडवणार:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा निर्धार; उद्योजक, अधिकारी आणि प्रशासनाची लवकरच संयुक्त बैठक होणार




राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकण औद्योगिक वसाहतीतील समस्या प्राधान्याने सोडवण्याची ग्वाही दिली आहे. रस्ते, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित समस्यांवर तातडीने मार्ग काढण्यासाठी लवकरच संयुक्त बैठक आयोजित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या बैठकीत उद्योजक, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी सहभागी होतील. सुनेत्रा पवार यांनी चाकण नागरी कृती समिती आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी चाकण एमआयडीसीतील उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी, खराब रस्ते, अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय अडथळ्यांची माहिती घेण्यात आली. उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या समस्यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौंडे आणि चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. चाकण एमआयडीसी ही पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाची औद्योगिक वसाहत आहे, जिथे देश-विदेशातील अनेक मोठे उद्योग कार्यरत आहेत. या परिसरातील पायाभूत सुविधा सक्षम झाल्यास औद्योगिक विकासाला अधिक चालना मिळेल, तसेच रोजगारनिर्मिती आणि गुंतवणुकीलाही फायदा होईल. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. उद्योजक, स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांना विश्वासात घेऊन चाकण एमआयडीसीतील समस्यांवर लवकरच ठोस उपाययोजना करण्यात येतील, असेही पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *