![]()
महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेर निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला आता काही महिने उलटून गेले असले तरी सिद्दीकी कुटुंबावरील संकटे थांबलेली नाहीत. बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे आमदार झीशान सिद्दीकी यांना पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे. या धमकीनंतर झीशान सिद्दीकी यांनी वांद्रे पोलिसांत धाव घेत तक्रार (NC) नोंदवली आहे. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पोलिसांच्या कारभारावर, आपल्या कमी केलेल्या सुरक्षेवर आणि बिल्डर लॉबीवर गंभीर आरोप केले आहेत. पोर्तुगालच्या नंबरवरून व्हॉईस नोटद्वारे धमकी धमकीविषयी माहिती देताना झीशान सिद्दीकी म्हणाले, “मी परदेशात होतो. तिथे असतानाच मला पोर्तुगालच्या नंबरवरून एक व्हॉईस नोट आली. त्या व्यक्तीने मला स्पष्टपणे धमकी दिली की, ‘मी तुलाही तुझ्या वडिलांप्रमाणेच गोळ्या घालून मारेन.’ यापूर्वीही मला सोशल मीडियावर अशा धमक्या आल्या होत्या. मी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस अधिकाऱ्यांना व्हॉईस नोटबाबत माहिती दिली आहे आणि आता वांद्रे पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे.” जेव्हा कोर्टाची तारीख असते, तेव्हाच धमक्या का येतात? झीशान यांनी या धमक्यांमागे एका विशिष्ट ‘बिल्डर लॉबी’चा हात असल्याचा संशय व्यक्त केला. “हा निव्वळ योगायोग आहे की आणखी काही? जेव्हा जेव्हा माझ्या आईने कोर्टात दाखल केलेल्या रिट याचिकेची तारीख जवळ येते, नेमकी तेव्हाच मला अशा धमक्या येतात. ही एक भित्री बिल्डर लॉबी आहे, जी अशा धमक्या देऊन आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. पोलिसांच्या तपासावर आम्ही अजिबात समाधानी नाही बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या तपासावर झीशान यांनी उघड नाराजी व्यक्त केली. “मी आणि माझे कुटुंब पोलिसांच्या तपासावर अजिबात खूश नाही. आम्ही पोलिसांना ज्या संशयितांची नावे दिली होती, त्यांची साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. एखादा माणूस आत्महत्या करतो, तेव्हा त्याने शेवटच्या 48 तासांत कुणाशी फोनवर बोलणे केले, याचा तपास होतो. इथे तर माझ्या वडिलांची निर्घृण हत्या झाली आहे, मग त्यांनी शेवटच्या काही दिवसांत कुणाशी संवाद साधला, याचा तपास का होत नाही? पोलीस नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत?” असा संतप्त सवाल झीशान यांनी विचारला. धमक्या वाढूनही माझी सुरक्षा का काढली? स्वतःच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बोलताना झीशान म्हणाले, “माझ्या वडिलांच्या हत्येपूर्वी काही महिने आधीही आमच्या घरावर फायरींग झाल्याची अफवा उडाली होती, तरीही त्यांची सुरक्षा वाढवली नाही. दुर्दैवाने, त्यांची हत्या झाली. आज मला दररोज धमक्या येत आहेत, तरीही नोव्हेंबर महिन्यात माझी सुरक्षा कमी करण्यात आली. माझ्याकडे 8 पोलीस आणि बिल्डिंगमध्ये 22 पोलीस होते. पण आईने कोर्टात रिट याचिका दाखल केल्यानंतर दोनच दिवसांत माझी सुरक्षा हटवण्यात आली. एका आमदाराला जर या देशात सुरक्षित वाटत नसेल, तर सर्वसामान्यांचे काय?” वडिलांच्या खुन्यांचा पर्दाफाश होत असेल, तर मी 100 गोळ्या खायला तयार भावनिक होत झीशान म्हणाले, “ज्या दिवशी माझ्या वडिलांची हत्या झाली, त्याच दिवशी आतला ‘झीशान’ मरून गेला आहे. मला आता कशाचीही भीती वाटत नाही. मला फक्त माझी आई आणि बहिणीची काळजी वाटते. जर मला गोळ्या घातल्यामुळे माझ्या वडिलांच्या हत्येमागील ‘मास्टरमाइंड’ उघड होत असेल, तर मी 100 गोळ्या खायलाही तयार आहे.” या संपूर्ण प्रकरणाबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करणार असल्याचे झीशान सिद्दीकी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, अजित पवार गटातील नेत्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा आपल्याला खंबीर पाठिंबा असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. हेही वाचा… ‘अखंड हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असावा’:शिवप्रतिष्ठानच्या पोस्टरवरून वाद, संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी आज, १५ ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, राज्यात मात्र एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांच्या संस्थेने सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका पोस्टरवरून हा वाद निर्माण झाला आहे. या पोस्टरमध्ये ‘अखंड हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवाच असला पाहिजे’ अशी भूमिका मांडण्यात आली असून, यावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत संभाजी भिडेंवर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
मी 100 गोळ्या खायला तयार, पण वडिलांच्या खुन्यांचा पर्दाफाश व्हावा:बिश्नोई गँगकडून आलेल्या धमकीनंतर झीशान सिद्दीकींचा संताप