![]()
शहरातील पवारवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पूर्वीच्या वादातून २४ वर्षीय तरुणावर लोखंडी पाइपने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. शनिवारी (दि. १५) सायंकाळी ६० फुटी रोडवरील पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी सात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना सोमवारी (दि. १७) न्यायालयात हजर केले जाणार आहे. मृत तरुणाचे नाव मोहम्मद जुबेर मोहम्मद अमीन अन्सारी असे आहे. या प्रकरणात उमर फारुख (रा. गुलशनाबाद), असलम शाह (रा. बोरमळा, रमजानपुरा), रिजवान शाह हसन शाह (रा. सलामताबाद) आणि वाहीद काल्या (रा. अब्बास नगर, मालेगाव) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुबेर हा शनिवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास पेट्रोलपंपाजवळ उभा असताना संशयितांनी त्याच्यावर अचानक लोखंडी पाइपने हल्ला केला. गंभीर दुखापत झाल्याने जुबेर रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पलायन केले. हल्ल्याचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. जुबेरचा यापूर्वी संशयितांपैकी काही जणांशी वाद झाला होता. त्याच वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. मृताचा नातेवाईक मोहम्मद उबेद मोहम्मद अमीन यांच्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलिसांनी सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, हसन शाह, इमराण शाह आणि इरफाण शाह हसन शाह (तिघेही रा. सलामताबाद) हे फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील करीत आहेत.
Source link
हत्या:मालेगावात पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; चौघे ताब्यात