Headlines

भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील एवढे मोठे खड्डे!:नाशिकच्या दुर्दशेवरून संजय राऊतांचे सरकारला सवाल- नाशिक हे चंद्रावरचे शहर आहे का?




नाशिक शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि खड्ड्यांमध्ये पडून झालेल्या मृत्यूंच्या सत्रावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली आहे. “नाशिक शहरात प्रशासनाने लोकांना रस्त्यावरच ‘स्विमिंग पूल’ निर्माण करून दिले आहेत. मी असे काही खड्डे पाहिलेत, ज्यात भाजपचे 80 नगरसेवक आणि शिंदे गटाचे आमदार एकत्र टाकता येतील,” असा शेलक्या शब्दांतील टोला राऊत यांनी लगावला. नाशिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी मखमलाबादसह इतर भागांतील रस्त्यांची पाहणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी खड्ड्यांच्या प्रश्नावरून आणि कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावरून सरकारवर हल्लाबोल केला. खड्डेमुक्त नाशिक आता चेष्टेचा विषय झालाय नाशिकच्या सद्य:स्थितीवर चिंता व्यक्त करताना राऊत म्हणाले, “दहा वर्षांपूर्वी नाशिकचा लौकिक ‘खड्डेमुक्त शहर’ असा होता. उत्तम प्रशासनामुळे नाशिक एक सुंदर शहर मानले जायचे. पण आजचे चित्र अत्यंत भयंकर आणि विद्रूप आहे. नाशिकचे खड्डे आता देशभरात चेष्टेचा विषय झाले आहेत. मखमलाबाद रोडवर फळे विकणाऱ्या एका महिलेने डोळ्यात पाणी आणून मला सांगितले की, साहेब आम्ही कसं जगायचं? ही अवस्था प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ओढावली आहे.” खड्ड्यांत 10 लोकांचा मृत्यू; हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंवरून त्यांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर बोट ठेवले. “माझ्या माहितीनुसार, खड्ड्यात पडून आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, पण प्रशासन हा आकडा लपवत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये आपले 6 जवान शहीद झाले होते, इथे तर 10 लोक मरण पावले आहेत. हे मृत्यू नसून प्रशासनाने केलेले 10 खून आहेत. या ठेकेदारांवर आणि आयुक्तांवर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल केला पाहिजे. गरज पडल्यास आम्ही न्यायालयात जाऊन ‘प्रायव्हेट गुन्हे’ दाखल करू.” नाशिक हे चंद्रावरचे शहर आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले, “पंतप्रधान आणि फडणवीस हे 2047च्या विकासाच्या आणि स्पेस टेक्नॉलॉजीच्या गप्पा मारतात. पण इथले खड्डे बघितले की वाटते, नाशिक हे चंद्रावरचे शहर आहे का? कारण चंद्रावरही खड्डे आहेत. पण चंद्रावर गेलेला नील आर्मस्ट्राँग सुखरूप परत आला, इथे मात्र चंद्रावर (नाशिकमध्ये) रोज लोक खड्ड्यात पडून मरत आहेत.” कुंभमेळ्यातून भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न राज्यात आला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत बोचरी टीका करत राऊत यांनी त्यांना ‘चंपतराय’ आणि ‘कुंभकर्ण मंत्री’ अशी उपमा दिली. “कुंभमेळ्याचे बजेट 15 हजार कोटींवरून थेट 45 हजार कोटींवर नेले आहे. आधी 15 हजार टॉयलेट (शौचालय) बांधणार होते, आता 55 हजार बांधणार आहेत. त्यात 10 हजार ‘व्हीआयपी टॉयलेट’ आहेत! व्हीआयपी टॉयलेट म्हणजे काय तिथे सोन्याचे कमोड असणार आहेत का? कुंभमेळ्याच्या नावाखाली टॉयलेटमध्ये पैसे खाणारा हा भाजपचा आणि गिरीश महाजनांचा ‘जामनेर पॅटर्न’ आहे, जो त्यांनी राज्यात आणला आहे.” आयुक्तांची तत्काळ बदली करा नाशिक महानगरपालिका आयुक्तांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राऊत म्हणाले, “नाशिकचे आयुक्त शेखर सिंग यांच्या चेहऱ्यावर थोडी तरी संवेदना दिसते का? 10 लोकांचा मृत्यू होऊनही कुणीही माफी मागितलेली नाही. या आयुक्तांची तत्काळ इथून बदली केली पाहिजे. या सर्व गोष्टींच्या विरोधात आज आम्ही अभूतपूर्व असा मोर्चा काढत आहोत. जोपर्यंत रस्ते सुधारत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला. अमित शहांनी वंदे मातरम् ची दोन कडवी म्हणून दाखवावीत वंदे मातरम् च्या मुद्द्यावरून अमित शहा यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचा राऊत यांनी समाचार घेतला. “अमित शहा यांनी स्वतःलाच विचारले पाहिजे की त्यांच्यात थोडीतरी लाज शिल्लक आहे का? ज्या पक्षाने स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला नाही, ज्यांच्या कार्यालयावर 50 वर्षे तिरंगा फडकला नाही, ते आता काँग्रेसकडे माफी मागत आहेत. मी अमित शहांना आव्हान देतो की त्यांनी समोर येऊन वंदे मातरम् ची किमान दोन कडवी तरी म्हणून दाखवावीत.” केंद्रातील आणि राज्यातील मंत्री इडियटच आहेत “केंद्रातील आणि राज्यातील मंत्री हे खरोखरच ‘इडियट’ आहेत आणि त्यांना तेच म्हटले पाहिजे. इडियट हा काही असंसदीय शब्द नाही. ‘थ्री इडियट्स’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि मोदींनीच तो पाहायला सांगितला होता,” असा टोलाही राऊत यांनी लगावला. हेही वाचा… पृथ्वीराज चव्हाणांना सध्या काही काम नाही: चर्चेत राहण्यासाठीच त्यांची धडपड; गोपीनाथ मुंडेंवरील दाव्यावरून बावनकुळे संतापले, रोहित पवारांवरही निशाणा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “पृथ्वीराज चव्हाण यांना सध्या काहीही काम उरलेले नाही, त्यामुळे केवळ मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी ते अशी वक्तव्ये करत आहेत,” असा घणाघात बावनकुळे यांनी केला आहे. तसेच, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या निवडणूक प्रक्रियेवरील टीकेचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. येथे वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *